मकरसंक्रांतीच्या सणावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 17:37 IST2022-01-14T17:37:32+5:302022-01-14T17:37:58+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बाहेरगावी देव दर्शनाला जाण्याऐवजी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेत घरगुती पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.

मकरसंक्रांतीच्या सणावर कोरोनाचे सावट
कोपर्डे हवेली : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीला महत्व असल्याने हा सण मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. पण, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बाहेरगावी देव दर्शनाला जाण्याऐवजी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेत घरगुती पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.
मकरसंक्रांती निमित्ताने महिला चाफळ, औंधसह इतर मोठ्या मंदिरात ववसा घेऊन देवदर्शनाला जात असतात. तर, पुरुषांसह कुटुंबातील सदस्यांना तिळगूळ वाटप करतात. तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा देतात. तिळगूळ वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात. त्यामध्ये तीळ, खोबरे, शेंगदाणे, गूळ, चिक्की आदींचा समावेश असतो. एकमेकांचे वैर विसरून तिळगूळ देऊन पुन्हा गोडवा निर्माण करणारा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोपर्डे हवेली परिसरात अनेक महिलांनी गावोगावच्या मंदिरात जावून ववसा घेऊन दर्शन घेतले. तर, लहान बालक, युवक, युवती, यांनी एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या.
दिवस होतो मोठा
मकरसंक्रांती सणाला अतिशय महत्त्व असून या सणानंतर दिवस मोठा होत जातो. शिवाय थंडीचे प्रमाण कमी होत जाते.