corona virus :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा :उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:44 IST2021-04-07T15:42:14+5:302021-04-07T15:44:29+5:30
CoronaVirus UdayanrajeBhosle Satara- कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत.

corona virus :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा :उदयनराजे भोसले
सातारा : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत.
राज्यात ज्याप्रकारे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेत कमालीची अस्वस्थता आहे. हे निर्बंध घालताना सरकारने विविध क्षेत्रांतील परिणामांचा अजिबात विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केशकर्तनालय, फेरीवाले, गॅरेजवाले, या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना विशिष्ट नियमावली घालून देऊन त्यांचा रोजगार सुरू ठेवावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
गेल्यावर्षी मार्चमध्ये अचानकपणे लॉकडाऊन झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. लाखो लोकांचा रोजगारही गेला होता. त्यामुळे अनेक लोक दारिद्र्यरेषेखाली ढकलले गेले. ही बाब लक्षात घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोनाची साखळी मोडण्यास मदत होईल असे नियोजन करणे आवश्यक असल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याचाही सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून गांभीर्याने विचार करावा. शैक्षणिक फीबाबतसुद्धा शासन कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. ही बाब चिंतेची आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.