corona virus : भीतीपोटी गरज नसताना बेड अडवू नका : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:40 IST2020-09-09T18:39:13+5:302020-09-09T18:40:04+5:30
कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज आहे, मात्र काही लोक भीतीपोटी बेड अडवून ठेवत आहेत, त्यांनी प्रशासनावर दबाव आणून बेड मिळविण्याचा आटापिटा करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

corona virus : भीतीपोटी गरज नसताना बेड अडवू नका : जिल्हाधिकारी
सातारा : कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज आहे, मात्र काही लोक भीतीपोटी बेड अडवून ठेवत आहेत, त्यांनी प्रशासनावर दबाव आणून बेड मिळविण्याचा आटापिटा करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनाने सर्व हॉस्पिटलमध्ये बेडचे नियोजन केले आहे. हे बेड गरजू रुग्णांसाठी आवश्यक आहे. जे कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू शकतात, त्यांनी रुग्णालयांमध्ये गर्दी करु नये. काही लोक बेड मिळविण्यासाठी डॉक्टरांवरच दबाव टाकत आहेत.
कोरोनावरील उपचारासंदर्भात डॉक्टरांना निर्णय घेऊ द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यांना घरी जायला हरकत नाही, अशा लोकांनी घरीच उपचार सुरु करावेत. बेडसाठी हट्ट धरु नका. प्रशासन बेडसची उपलब्धता करीत आहे. जिल्ह्यामध्ये केसेसमध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या काळात ज्याला गरज आहे त्याला बेड भेटणे आवश्यक आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरु नका. डॉक्टरांची मिटिंग घेतली. प्रत्येक पेशंटने रुग्णालयात येण्याची गरज नाही. पल्स आॅक्सिमिटर घरामध्ये ठेवा. जवळच्या डॉक्टरला दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा. कुठल्याही परिस्थिती घाबरुन जावू नका.
कोरोनामध्ये बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. ९८ टक्के लोक बरे होत आहेत. सातारा जिल्हा अनलॉकच्या शेवटच्या टप्प्यात आहे. लॉजिंग सुरु केले असले तरी रेस्टॉरंटमध्ये जेवणाची परवानगी अयाप दिलेली नाही. मास्कचा वापर करा, नातेवाईकांना भेटला तरी ते खाली घेऊ नका. बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.