कोरोनाबाधितांनी विलगीकरण कक्षात थांबावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST2021-06-18T04:27:05+5:302021-06-18T04:27:05+5:30
मसूर : ‘कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एखादा रुग्ण कोरोनाबाधित ...

कोरोनाबाधितांनी विलगीकरण कक्षात थांबावे
मसूर : ‘कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एखादा रुग्ण कोरोनाबाधित आढळला तर त्याने ग्रामपंचायतीने उभारलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहावे. स्वत:बरोबर कुटुंबाचे व गावचे आरोग्य जपावे,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कऱ्हाड तालुक्यातील कवठे येथील श्री जोतिर्लींग विद्यालयात ग्रामपंचायतीने उभारलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सचिव संगीता साळुंखे, सारंग पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रांत उत्तम दिघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड उपस्थित होते.
सरपंच लालासाहेब पाटील म्हणाले, ‘कवठेच्या आरोग्यासाठी आरोग्य उपकेंद्र व्हावे. गावचा रस्ता करावा तसेच कृष्णा नदीवर कवठे-कोर्टी पूल तयार करावा.’
यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, सुनील पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रारंभी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
अशोकराव पाटील यांनी स्वागत केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले तर जे. एम. शिंदे यांनी आभार मानले.
कोट
कोरोनाचा ‘को’ काढला तर नुसतेच ‘रोना’ आहे. त्याचा उलटा नारो करायचा असेल तर बाधित रुग्णांनी विलगीकरण कक्षात थांबावे. कोरोनाला धरुन बाजूला केले पाहिजे. म्हणजे रुग्णाला धरुन इथे आणले पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात सर्वांनी सामाजिक अंतर राखून म्हणजे वेगवेगळे राहावे तरच भविष्यात एकत्र येऊ,’ असा सल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिला.
फोटो १७ कवठे
कवठे येथे विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)