जिंतीत कोरोनाचा वेग मंदावला; पण डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:18+5:302021-06-20T04:26:18+5:30
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसात डेंग्यूचे वीस ...

जिंतीत कोरोनाचा वेग मंदावला; पण डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसात डेंग्यूचे वीस रुग्ण सापडले आहेत तर खासगी रुग्णालयात पाचजणांवर उपचार सुरू आहेत. यामुळे कोरोनातून कसेतरी गाव सावरत असतानाच डेंग्यूने डोेके वर काढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिंती गावामध्ये कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे. कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती वाढली आहे. जिंती येथे कर्मवीर चौक, लक्ष्मी नगर परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होत असल्याने दिसून येत आहे. गावामध्ये कोरोनाचा प्रकोप आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे; पण पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे आता मलेरिया, डेंग्यू आणि मेंदूज्वरासारख्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरुवात झाली की, ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढते. त्यातून सर्वाधिक प्रमाणात डेंग्यू, टायफॉईड पसरतो. तसेच गावामध्ये डेंग्यूची एकूण रुग्णसंख्या वीस झाली आहे. यामध्ये डेंग्यूचे खासगी रुग्णालयात सध्या पाच रुग्ण उपचार घेत आहेत. एका रुग्णाला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या परिस्थितीला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
चौकट :
लेखी तक्रारीचा सल्ला
या संदर्भात काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला माहिती दिली असता, ‘अगोदर लेखी तक्रार ग्रामपंचायतीमध्ये करा व नंतर योग्य पद्धतीने उपाययोजना केली जाईल,’ असे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना उत्तर दिले जाते. अनेकवेळा तोंडी-लेखी तक्रार ग्रामस्थ करतात. पण तुम्ही गावठाणात नसून जंगलात राहत असल्याने कामे करता येत नाहीत, असे सांगितले जाते.
कोट :
डेंग्यूचे रुग्ण सापडल्यानंतर दोन ते तीनवेळा धुराची फवारणी केली. बाकी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. ग्रामपंचायतीकडून सांगितले जाते की, तुमच्याकडून सांडपाणी साठवले जाते. आम्ही जंगलामध्ये राहतो. आमच्याकडून कर वसुली केली जाते पण आमच्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही.
- संगीता वाघमारे,
ग्रामस्थ, महिला.
फोटो १९ जिंती-डेंग्यू
फलटण तालुक्यातील जिंती येथे अशाप्रकारे अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. (छाया : प्रशांत रणवरे)