शिवथर : शिवथर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत शिवथर यांच्यामार्फत शनिवारी कोरोना तपासणी शिबिर शिवथर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण २५ जणांची तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवथर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जिल्हा परिषद शाळा शिवथर येथे कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात गावात १०० हून अधिक पेशंट सापडले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावातील एकूण २५ जणांची तपासणी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार किराणा दुकानदार, भाजी विक्रेता, फळे विक्रेता, तसेच पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यावेळी लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे.