लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये घर बांधकामाला विशेष महत्त्व असते. डोईवर छप्पर येण्यासाठी वर्षानुवर्षे राबून मेहनत घेणाऱ्या लोकांना कोरोना महामारी आणि त्यानंतर लगोलग झालेली इंधन दरवाढ या दोन्ही गोष्टींचा मोठा अडथळा आला आहे.
कोरोना महामारीमुळे अनेक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या; तर अनेकांना व्यवसायात घाटा आला. नोकऱ्या गेलेल्या लोकांनी नव्याने व्यवसाय सुरू केले; परंतु या व्यवसायांनी अजूनही गती धरलेली नाही. या महामारीचा फटका बांधकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसल्याचे चित्र आहे.
आता पेट्रोल, डिझेल या इंधनांचे भाव सरकारी नियंत्रणात राहिले नसल्याने ते वाढत आहेत. याचा मोठा फटका बांधकाम क्षेत्रासह सर्वच व्यवसायांना बसलेला आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये वाळू, ग्रिड, सिमेंट, स्टील, विटा, खडी यांचे भाव वाहतूक खर्च वाढल्याने वाढले आहेत. सर्वसामान्यांनी घर बांधायचे म्हटले तरी त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर लग्नाले गगनाला भिडले असल्याने घर बांधणे तसे कठीण होऊन बसले आहे.
या परिस्थितीमध्ये बांधून तयार असणाऱ्या घरांना जास्त मागणी असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये गृहिणीच्या नावावर जर घर किंवा अन्य कोणतीही मिळकत खरेदी केली तर त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क एक टक्का इतके माफ करण्यात आलेले आहे. हा एकमेव दिलासा राज्यातील जनतेला आहे. ३१ मार्चनंतर नवीन आर्थिक वर्षामध्ये मुद्रांक शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु महिलांच्या नावावर मिळकत खरेदी केल्यास एक टक्का सवलत ही सुरूच राहणार आहे. महिलांच्या नावावर घर खरेदी वाढलेली पाहायला मिळते.
बांधकाम साहित्याचे दर
क्रश सँड : सध्या ४५०० ब्रास, इंधन दरवाढीपूर्वी ३५०० ब्रास
सिमेंट : सध्या ३२० पोते , इंधनदरवाढी पूर्वी २९० पोते
स्टील : सध्या ५५ रु. किलो, इंधन दरवाढीपूर्वी ४५ रु. किलो
वीट : सध्या १० रु. इंधन दरवाढी पूर्वी ८ रु. प्रतिनग
खडी : सध्या २५०० रु. इंधन दरवाढीपूर्वी २३००
कोट
कोरोना महामारी, तसेच वाहतुकीचा खर्च वाढल्याने सध्या या परिस्थितीमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. साहित्य वाढले असल्याने भांडवलदेखील जास्त घालावे लागत आहे.
- प्रशांत सावंत, इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन, सातारा
मजूर परतल्याने कामांना गती
कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले होते. या काळामध्ये अनेक बांधकाम मजूर पण राज्यातील आपल्या गावी निघून गेले होते. आता हे मजूर परतले असल्याने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगाने काम सुरू असल्याचे पाहायला मिळते.
(घराच्या बांधकामाचा योग्य फोटो वापरावा)