कोरोना महामारीची वर्षपूर्ती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:19+5:302021-03-23T04:41:19+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाले आहे. मागील वर्षी २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण स्पष्ट ...

कोरोना महामारीची वर्षपूर्ती...
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाले आहे. मागील वर्षी २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण स्पष्ट झाला. तर, आतापर्यंत तीन लाख ८६ हजार जणांची चाचणी करण्यात आली. तसेच ६२ हजारांवर बाधित स्पष्ट झाले आहेत. तर, एक हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सुरुवातीला खंडाळा तालुक्यात त्यानंतर सातारा शहराजवळील खेड येथे कोराेना रुग्ण आढळला. टप्प्याटप्प्याने मग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. एप्रिल महिन्यात तर १०-२० च्य्या संख्येने बाधित वाढत होते. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णांची संख्या वाढली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर १००-२०० च्या पटीत रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली. परिणामी, तालुकानिहाय कोराेना सेंटर उघडली गेली. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधित आकडा ३८ हजारांवर गेला होता. या काळात कोरोनाचा कहर होता. जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही बाधितांची संख्या कमी होत नव्हती. ऑक्टोबर महिन्यानंतर मात्र रुग्णसंख्या हळूहळू कमी झाली. जानेवारी महिन्यापर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्ण तसेच मृतांचे प्रमाण वाढले.
जिल्ह्यात सध्या ६२ हजार ४३९ बाधित आढळून आले आहेत. तर, कोरोनातून बरे झालेल्या ५८ हजार १८९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, तीन लाख ८६ हजार २५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
चौकट :
२३ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.
६२,३४९ कोरोनाचे एकूण रुग्ण
५८,१८९ बरे झालेले रुग्ण
१८८७ एकूण कोरोना बळी
२३६३ सध्या उपचार सुरू असलेले
११ कोविड सेंटर्स
चौकट
असे वाढले रुग्ण
मार्च २०२० १
एप्रिल ७९
मे ४९६
जून ५८९
जुलै ३०११
ऑगस्ट १०,७०१
सप्टेंबर २२,८११
ऑक्टोबर १०,६२४
नोव्हेंबर ४९४४
डिसेंबर २८७१
जानेवारी २०२१ १९२१
फेब्रुवारी २५६५
मार्च १६७९
.........
जिल्ह्यात औषधसाठा पुरेसा...
जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. मास्कसह कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारा औषधसाठा पुरेसा आहे. तसेच घरी विलगीकरण करण्यात येणाऱ्यांना औषधे देण्यात येत आहेत. औषधे कमी पडल्याचे कोठेही समोर आलेले नाही.
जिल्ह्यात कोविड सेंटर्स सुरूच...
कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर कोविड सेंटर्स कमी करण्यात आली होती. मात्र, आता सर्व ११ तालुक्यांत कोविड सेंटर्स सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणची क्षमता ३० आहे. रुग्ण वाढले तर क्षमता वाढविण्यात येणार आहे.
सुरुवातीला सापडलेले रुग्ण चांगले...
जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात खंडाळा आणि सातारा तालुक्यांत कोरोनाबाधित आढळून आले. या सर्वांची प्रकृती चांगली आहे. त्यानंतर, कोणालाही कोरोनाची बाधा पुन्हा झाली नाही. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेले सर्व बाधित नोकरी तसेच आपापल्या कामावर जात आहेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
.........................................................................