कोरोनामुळे पुसेगावच्या बटाटा बियाणे बाजारात निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:27+5:302021-06-20T04:26:27+5:30

पुसेगाव : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, शेती आणि शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ...

Corona discourages Pusegaon's potato seed market | कोरोनामुळे पुसेगावच्या बटाटा बियाणे बाजारात निरुत्साह

कोरोनामुळे पुसेगावच्या बटाटा बियाणे बाजारात निरुत्साह

पुसेगाव : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, शेती आणि शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुसेगाव बटाटा बियाणे बाजारपेठेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात खेड मंचरनंतरची बटाटा बियाणे विक्री व खरेदीची पुसेगाव ही दुसरी प्रमुख बाजारपेठ आहे. ज्या बाजारपेठेतून दरवर्षी पाचशे ते सातशे ट्रक बटाटा बियाणे विक्री होते. यंदा आतापर्यंत वीस ट्रकच बियाण्याची विक्री झाली आहे.

खटाव तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात असला तरी या तालुक्याचा उत्तर भाग उंच पठारावर आहे. येथील थंड हवामान बटाटा पिकास पोषक असल्याने पुसेगाव परिसरातील असंख्य गावे व वाड्या वस्त्यांवरील शेतकरी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतात. बाजारपेठेत खात्रीशीर बटाटा बियाणे मिळत असल्याने सांगली, विटा, खानापूर, कोरेगाव, कऱ्हाड, सातारा, फलटण या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात याच बाजारपेठेतून बियाणे खरेदी करतात.

गेले दोन वर्षांपूर्वी या पेठेतून पाचशे ते सातशे ट्रक बियाणे होत होते. गतवर्षी अडीचशे ते तीनशे ट्रक बियाणे विक्री झाले. मात्र, कोरोनाचा गंभीरकाळ असल्याने उत्पादित केलेला बटाटा विक्री करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले.

सततचा लॉकडाऊन, कंपन्या, मार्केट बंद

त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या या भांडवली नाशवंत मालाचे काय आणि कसे करावे हीच चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती. कोरोनाचा कहर असाच पुढे राहिल्यास अडचणीत सापडण्याऐवजी बटाटा पीकच नको अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे.

चौकट -

बटाटा बियाणे बाजारपेठेत होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल यावर्षी मंदावलेली दिसत आहे. खत, औषध विक्रेते, बारदान दुकानदार, वाहन चालक, हमाल, व्यापारी, त्यांचे कर्मचारी अशा अनेकांचा चरितार्थ याच बाजारपेठेवर चालतो. आसपासच्या वाड्यावस्त्यांवरील दोनशे हमाल दिवसभर बाजारपेठेतून आर्थिक तुटपुंजी साठवत असतात. मात्र, कोरोनाने शेतकऱ्यांसह इतरांच्याही तोंडचा घास हिरावून घेतल्याचा प्रकार पुसेगाव बाजारपेठेत अनुभवयास येत आहे.

- गणेश विधाते,

बटाटा बियाणे व्यापारी, पुसेगाव

चौकट -

सध्या उपलब्ध असलेले बटाटा बियाणे व प्रति क्विंटलचे दर पुढीलप्रमाणे : ज्योती १९०० रुपये, आयटीसी (चंबळ) २३०० रुपये, एफसी ३ - ३००० ते ३१०० रुपये, १५३३ वाण ३००० ते ३१०० रुपये.

प्रत्येक वाणाच्या बोर (लहान आकार) बटाटा बियाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

फोटो १९पुसेगाव-बटाटा

खटाव तालुक्यातील पुसेगाव बाजारपेठेत बटाटा बियाण्याची आवक झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी पाठ फिरवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

Web Title: Corona discourages Pusegaon's potato seed market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.