जिल्ह्यात कोरोनाने हिरावले १८३ कुटुंबप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:37+5:302021-05-31T04:27:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जीवनाच्या संघर्षात दोन हात करत असलेली अनेक कुटुंब या कोरोनाच्या काळात गुडूप झाली तर ...

जिल्ह्यात कोरोनाने हिरावले १८३ कुटुंबप्रमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जीवनाच्या संघर्षात दोन हात करत असलेली अनेक कुटुंब या कोरोनाच्या काळात गुडूप झाली तर काही कुटुंबांमधील प्रमुख व्यक्तीलाच कोरोनाने हिरावून नेले. त्यामुळे जिल्ह्यात अशाप्रकारची जवळपास १८३ कुटुंब आता उघड्यावर पडली असून, या कुटुंबांना खरंतर आता आर्थिक मदतीची गरज आहे. शासनानेही आता या कोरोनाच्या लाटेमध्ये ज्या घरातील कुटुंबप्रमुख गेले आहेत, त्या कुटुबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसात हे सर्वेक्षण होणार आहे.
जिल्ह्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट एखाद्या वादळाप्रमाणे सुरू आहे. सरसकट गावेच्या गावे आणि कुटुंब बाधित आढळून येत आहेतच शिवाय या लाटेने अनेकांना गिळंकृत केले आहे. कोणाचा भाऊ तर कोणाची आई तर कोणाची बहीण तर कोणाचे वडील या कोरोनाने हिरावून नेले आहेत. सुख-दुःख झेलत कुटुंबाचा गाडा हाकणारे कुटुंबप्रमुखच या कोरोनाच्या लाटेमध्ये दगावल्याने अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. एवढेच नव्हे तर या कोरोनाने जात-पात-धर्म पाहिला नाही की, श्रीमंत-गरीब पाहिला नाही. पण सर्वात जास्त फटका बसला तो रोजच्या भाकरीसाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्यांना. अशीच काही प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता समोर आणत आहेत.
साताऱ्यातील शाहू कला मंदिराशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून एक वडापाव विक्रेता होता. मध्यवर्ती ठिकाण असल्याने तो विक्रेता शहरातील बऱ्याच प्रतिष्ठित, सामाजिक लोकांच्या ओळखीचाही होता. दोन विवाहित मुली, एक मुलगा, पत्नी असा त्याचा परिवार. रोज वडापाव विकल्यानंतरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असायचा. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत होती. अशातच त्यांना गत महिन्यात कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वीज कोसळावी तसा त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा लहान असल्यामुळे सर्व जबाबदारी आता पत्नीवर आलीय. घरातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावल्याने त्या वडापाव विक्रेत्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्रोत जागच्या जागी थांबला.
अशीच आणखी एका कुटुंबाची हृदय हेलावून टाकणारी वाताहात समोर आलीय. सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवकाने तीन वर्षांपूर्वी टुरिस्टसाठी फायनान्सचे कर्ज काढून कार खरेदी केली होती. त्याचे लग्नही वर्षभरापूर्वी झाले होते. त्याच्या घरात आई, लहान भाऊ, पत्नी आणि वडील असा त्यांचा परिवार. कोरोना काळात टुरिस्ट व्यवसाय ठप्प झाल्यामुळे तो भाजी विक्रीचेही काम करत होता. अशातच त्याला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अकराव्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. अगोदरच फायनान्सचे कर्ज, घरात आर्थिक चणचण आणि त्यातच घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला.
वाई तालुक्यातील एक तीस वर्षीय युवक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. कोरोनाबाधित रुग्णांना तो औषधे देत होता. एके दिवशी अचानक त्याला ताप आला. त्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली, तेव्हा तो बाधित असल्याचे आढळले. सिव्हीलमध्ये काही दिवस उपचार केल्यानंतर त्याने खासगी रुग्णालयामध्येही उपचार केले. मात्र, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरातील सर्व त्याच्यावर अवलंबून होते. आता तोच गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. शासनाकडून मदत मिळावी म्हणून त्याचे मित्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
अशाप्रकारे अनेक कुटुंब या कोरोनाच्या लाटेमध्ये उद्ध्वस्त झाली आहेत. पुन्हा त्यांना उभारी घेण्यासाठी आता खरंतर शासनाच्या मानसिक आणि आर्थिक बळाची गरज आहे. ही प्रातिनिधिक स्वरूपात तीन कुटुंबांची झालेली वाताहात आपल्याला दिसून येत असली, तरी अशाप्रकारची अद्यापही अनेक कुटुंब चिंताग्रस्त आणि आर्थिक गर्तेत सापडलेली आपल्याला पाहायला मिळतील.
चौकट : गाव पातळीवर होणार सर्वेक्षण
जिल्ह्यात सध्या तीन हजाराहून अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, यातील कोणाची परिस्थिती कशी होती, पुढे त्या कुटुंबाचं काय झालं, याची आकडेवारी शासनाकडे अद्यापही नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले, तात्पुरत्या स्वरूपात अशाप्रकारचे सर्वेक्षण भविष्यात गाव पातळीवर होणार असून, सध्या उपलब्ध माहिती एका व्यक्तीने काढली होती. त्यातून १८३ कुटुंबांची माहिती प्रशासनासमोर आली आहे.