प्राथमिक शिक्षकाकडून कोरोना जनजागृतीचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:11+5:302021-01-03T04:37:11+5:30
पाचवड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंधवली (ता. वाई) येथील शिक्षक अनिल जाधव यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात रस्त्यांवर कोरोना ...

प्राथमिक शिक्षकाकडून कोरोना जनजागृतीचा ध्यास
पाचवड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंधवली (ता. वाई) येथील शिक्षक अनिल जाधव यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात रस्त्यांवर कोरोना जनजागृती संदेश लिहून एक वेगळेपण जपले आहे. त्यांनी चिंधवली गाव, वाई मुख्य रस्ता, पाचगणी मुख्य बाजारपेठ येथे कोरोनामुक्ती संदेश लिहिले आहेत.
‘कोरोना हरेल, शाळा भरेल’, ‘सुरक्षित अंतर, कोरोना छू मंतर’ असे रस्त्यांवर रात्रीचे वेळी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत स्लोगन लेखन केले आहे. लोक सध्या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. गर्दी करीत आहेत. बेजबाबदारपणे वागत आहेत. अशावेळी त्यांना पुनश्च लॉकडाऊनला सामोरे जावे लागू नये व त्यांनी नियम पाळावेत म्हणूनच हा सारा या शिक्षकाचा खटाटोप आहे. सध्या जगात कोरोना समांतर दुसरा विषाणू येऊ घातला आहे. अशावेळी आपण सजग राहिले पाहिजे. आपणाच यावर नियंत्रण आणू शकतो. आपली मानसिकता बदलून योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. यापुढे लॉकडाऊन कोणालाच परवडणारे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी अनिल जाधव शिक्षक, मुलांच्या माध्यमातून पालकांपर्यंत जात आहेत. जाधव यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच मार्च महिन्यात कोरोना जनजागृती पोवाडा रचून शाळेतील मुलांसमवेत याचे गायन केले. त्याचे प्रक्षेपणही झाले होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत कोरोना निषेध आरती गायली. ती यूट्यूबवर चांगलीच गाजली. ‘कोरोना हरेल, शाळा भरेल’ या त्यांनी रचून गायलेल्या गीताला हजारो लाईक्स मिळाले आहेत. वाईचे शरद यादव, महेश सपकाळ, मित्र सुनील पार्टे व संतोष कासुर्डे, सुमित जाधव तसेच त्यांच्या मुली श्रेया जाधव व श्रुती जाधव यांनी या लेखन कामी मदत केली आहे. वाईच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख तसेच ग्रामस्थ यांनी विशेष कौतुक केले.
चौकट...
स्लोगन वाचण्यात नागरिक दंग...
कोरोना काळात बाधित शिक्षकांना भेटून त्यांनी धीर देण्याचे धाडस दाखविले आहे. कोरोना जनजागृती भरारी पथकातही त्यांनी काम केले आहे. सध्या त्यांचे स्लोगन लोकांमध्ये कुतूहलाचा विषय आहे. ते एक खरोखरच कोरोना योद्धा आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. स्लोगन वाचताना लोकांचे पाय आपोआप थांबून लोकांकडून या स्लोगनांचे वाचन होत आहे.
फोटो आहे...
०२पाचवड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंधवली (ता. वाई) येथील शिक्षक अनिल जाधव यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात रस्त्यांवर कोरोना जनजागृती संदेश लिहून एक वेगळेपण जपले आहे.