कोरोना व घरच्या घरी पंचकर्मे महत्त्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST2021-04-22T04:41:04+5:302021-04-22T04:41:04+5:30
वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे नस्य म्हणजेच औषधी तेल किंवा तुपाचे थेंब नाकपुडीमध्ये दिवसांतून ३ वेळा टाकावेत यामुळे नाकातील कोरडेपणा कमी होऊन ...

कोरोना व घरच्या घरी पंचकर्मे महत्त्व !
वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे नस्य म्हणजेच औषधी तेल किंवा तुपाचे थेंब नाकपुडीमध्ये दिवसांतून ३ वेळा टाकावेत यामुळे नाकातील कोरडेपणा कमी होऊन वातावरणातील धूर, धूळ, जंतूंचे नाकाद्वारे होणारे संक्रमण रोखले जाते. घशातील कफाचा अतिरिक्त चिकटपणा कमी होऊन घशाची खवखव, दुखणे, आवाजातील बदल ठीक करण्यासाठी त्रिफळा, सेंधव व हळदीच्या काढ्याने गुळ्या कराव्यात. १ चमचा हळद व १ चिमूटभर दालचिनी पावडर व १ चमचा मध यांचे चाटण करावे. वेखंड पावडरची धुरी घेतल्याने कफदोष कमी होतो. खाेकल्याची ढास कमी करण्यासाठी शरीर प्रकृतीनुसार तीळ तेल, मोहरी तेल, खोबरेल तेल व मिठाचा लेप छाती, पाठ, मानेला लावून शेक घ्यावा. रोज रात्री तळपायांना एरंडेल तेलाने मसाज करावा. या काळात दिवसभर दोन लिटर पाण्यात ५० ग्राम चिमूट वेलदोडे पुड टाकून केलेले पाणी प्यावे. शिवाय सकाळच्या वेळेत तोंडामध्ये थोड्या वेळासाठी तिळाचे तेल धारण करावे. कपाळावरही जायफळ, सुंठ किंवा ज्येष्ठमधाचा लेप लावावा.
वैद्याच्या मार्गदर्शनाखाली गूळ व हळद यांचा विरेचन विधी घरी करता येतो. सलग १२ दिवसांचा हा उपक्रम आहे. यामुळे शरीरशुद्धी होऊन इम्युनिटी वाढते. रोज सकाळी उपाशीपोटी पहिल्या दिवशी प्रत्येकी एक चमचा हळद व गूळ एकत्र करून खाणे. त्यानंतर पुढे पाच दिवस याचे प्रमाण वाढवत जाणे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा केवळ मूगडाळीचे सूप, मूगडाळीचे धिरडे आणि रोज रात्री भाजी भाकराचा आहार घ्यावा. सातव्या दिवशी पोटभर दहीभात किंवा ताक भात खावा. आठव्या दिवशी सकाळी उपाशी ८० ते १०० मिली एरंडेल तेल सुंठीच्या काढ्यासोबत प्यावे. यामुळे जुलाब होऊन शरीरशुद्धी होते. जुलाबा दिवशी केवळ भाताची पेज घ्यावी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. जन्म प्रकृतीनुसार औषधी काढ्याचा एनिमा देणे, फेब्रुवारी ते मे महिन्यात जन्मलेल्यांना तीळ तेलाने सर्वांगाला मसाज, जून ते सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्यांना मोहरीचे तेल तर ऑक्टोबर ते जानेवारीत जन्मलेल्यांना खोबरेल तेलाने मसाज करतात. डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार स्टीमबाथ दिली जाते. जानुबस्ती, कटीबस्ती, लेपन चिकित्सा व रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना अभ्यंग व तेलाचा एनिमा दिला जातो. कोविड काळात शरीराला अशा सर्व्हिसिंगची गरज असते. याबरोबरच मन:शांतीसाठी योग, प्राणायाम, ध्यान धारणा यामुळे रुग्णांना फायदा होतो.
-वैद्य सुयोग दांडेकर,
-प्रधान वैद्य, प्रकृती हेल्थ सेंटर, सातारा