कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची गळती काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असतानाही त्याच ठेकेदाराला कारंडेवाडी येथील तलाव गळती दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे. यामुळे संबधित विभागाच्या भूमिकेविषयी ग्रामस्थांमधून शंका उपस्थित केली जात आहे.
बामणवाडी येथील पाझर तलावाचे १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी पेपरचा वापर करण्यात आला. तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूला चर खोदून हा पेपर टाकण्यात आला होता. त्यावेळी संबधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, तलावात पाणीसाठा जास्त दिवस टिकला नाही. दुरूस्तीनंतरही पहिल्यापेक्षा दुपटीने गळती वाढल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात आला.
बामणवाडी ग्रामपंचायतींतर्गत २०१९मध्ये जून - जुलै महिन्यात कारंडेवाडी येथे लघुपाटबंधारे विभागाकडून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावाला सुरूवातीपासूनच मुख्य भिंतीच्या खालून मोठी गळती असल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत होता. परिणामी या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली. या मागणीनुसार तलाव दुरूस्तीसाठी अकरा लाख रुपये निधी मंजूर झाला असून, दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, बामणवाडी येथील तलावाची गळती दुरुस्ती ज्या नवीन तंत्रज्ञानाने काढण्यात आली, त्याच तंत्रज्ञानाद्वारे एचडीपी पेपर वापरून येथील गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र, कितपत गळती काढण्यास यश येईल, हे वेळच ठरवेल.
- चौकट
काम करतं कोण?
कुसूर परिसरातील एका पदाधिकाऱ्याचे ठेकेदाराशी सलोख्याचे संबंध आहेत. परिणामी, संबंधित काम त्या ठेकेदाराचे आहे का त्याचे नावे अन्य कोणी करत आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे.
- चौकट
पाण्याअभावी विहिरीत ठणठणाट
कुसूर विभागातील संपूर्ण भाग कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना शेतजमीन ओलिताखाली घेण्यासाठी नदी किंवा अन्य शासनाची कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी काढल्या आहेत. परंतु, पाण्याअभावी विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पाझर तलाव निर्मितीमुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन विहिरीत पाणीसाठा होण्यास मदत होते.
- चौकट
पाच वाड्यांचा पाणीप्रश्न सुटेल
शिबेवाडी आणि कारंडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर बामणवाडी, खड्याचीवाडी आणि चाळकेवाडीला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून काही अंतरावर आहे. तलावात बारमाही पाणीसाठा झाल्यास पाच वाड्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे.