कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आता चक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:58+5:302021-04-06T04:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता, प्रशासनाला बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे दिवसेंदिवस अवघड बनले आहे. असे ...

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आता चक्क
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता, प्रशासनाला बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे दिवसेंदिवस अवघड बनले आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाचा भार हलका होत आहे. आपल्या संपर्कात कोण, कोण आले, त्यांना फोन करून, आपणही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे रुग्ण सांगत आहेत.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना वाढीचा वेग दुपटीने असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, हे पाहण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल होते. संबंधित बाधित व्यक्ती कुठे कुठे फिरली, त्याचे मोबाईल लोकेशनही काढले जात होते. मात्र, यंदा याउलट स्थिती असून, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे बंदच झाले आहे. यावर्षी प्रशासनाने केवळ लसीकरण केंद्रांवर भर दिला आहे. त्यामुळे काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा मात्र, प्रशासनाला विसर पडला आहे. ही परिस्थिती पाहून कोरोनाबाधित रुग्णांनीच आता काॅन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पुढाकार घेतला आहे. स्वत: बाधित आढळून आल्यानंतर, आपल्या संपर्कात कोण कोण आले, त्याला ते फोन करून कोरोना चाचणी करण्यास सांगत आहेत. प्रत्येकाने ही जबाबदारी घेतल्यामुळे प्रशासनाचे काम अत्यंत हलके झाले आहे. खरे तर काॅन्टॅक्ट ट्रेसिंगला मनुष्यबळाची आवश्यकता असते. गतवर्षी प्रशासनाने आपल्यापरीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातून अनेकांना अनुभव आला. त्यामुळे यावर्षी लोकांनी प्रशासनाची वाट न पाहता थेट आपापली जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतलाय.
बाधितांनी काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा हा नवा पायंडा पाडला असला तरी, त्यांच्या संपर्कातूनही अनेकजण सुटू शकतात. बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या संपर्कात कोण कोण आले, हे समजणे कठीण आहे. केवळ आपल्या घरातील आणि आजुबाजूचे लोकच संपर्कात आले, तर समजणार आहेत. परंतु हे जरी समजले तरी बाधितांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे बाधितांनी आपापल्या संपर्कात कोण कोण आले, हे आठवून त्यांना फोन करून त्यांना चाचणी करण्यास भाग पाडावे. तरच ही कोरोनाची लाट रोखण्यास मदत होईल.
चाैकट :
एकाच्या सतर्कतेमुळे ११ जण पाॅझिटिव्ह समजले.
एका व्यक्तीने स्वत: बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर संबंधितांनी पाच दिवसांनंतर कोरोना चाचणी केली असता, घरातील सातजण पाॅझिटिव्ह आढळून आले. त्या लोकांनी पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना फोन केला. त्यांनीही चाचणी केल्यानंतर चारजण पाॅझिटिव्ह आढळून आले. अशाप्रकारे बाधितांनीच काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा फंडा अमलात आणला आहे.