उदयनराजेंना जखडवून ठेवण्यासाठीच षडयंत्र...
By Admin | Updated: March 24, 2017 00:17 IST2017-03-24T00:17:57+5:302017-03-24T00:17:57+5:30
‘साविआ’चा आरोप : खंडणीच्या गुन्ह्याशी काडीचाही संबंध नाही

उदयनराजेंना जखडवून ठेवण्यासाठीच षडयंत्र...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य व्यक्तींवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हे एक राजकीय षडयंत्र आहे. वास्तविक सोना अलायन्स कंपनी मालकाला झालेल्या मारहाणीचा आणि उदयनराजे यांचा काडीचाही संबंध नाही. जखडवून ठेवण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षडयंत्र आहे,’ असा आरोप सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, माजी नगरसेवक संजय शिंदे यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. १८ रोजी झालेल्या मारहाणीची दि. २३ रोजी तक्रार दाखल होते. यावरूनच अशी तक्रार देणे हे एक राजकीय षडयंत्रच असल्याचे स्पष्ट होत आहे. मारहाण झाल्यावर त्याच दिवशी किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल झाली असती तर आपण समजू शकलो असतो; परंतु सोना अलायन्स कंपनीचा कामगारांचा सुरू असलेला संप, त्या विरोधात कामगारांवर कंपनीच्या माध्यमातून चालवलेली दडपशाही आणि हे सर्व करूनसुद्धा कामगार संपावरून हटत नाहीत, असे दिसून आल्यावर या कंपनीत कार्यरत असलेल्या शिवप्रताप माथाडी कामगार युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे. यासर्व बाबी शंकास्पद असून, खासदारांची राजकीय आणि व्यक्तिगत बदनामी करण्यासाठी आणि त्यांचा उत्कर्ष सहन होत नसललेल्या लोकांचे हे एक राजकीय षडयंत्र आहे. (प्रतिनिधी)