किल्ले वसंतगडावरील बुरुजांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:16+5:302021-06-23T04:25:16+5:30
किल्ले वसंतगडावरून सोमवारी सायंकाळी श्रमिक गोजमगुंडे यांनी राज्यातील दुर्गप्रेमींशी आॅनलाईन संवाद साधत किल्ले वसंतगडसाठी ही साद घातली आहे. या ...

किल्ले वसंतगडावरील बुरुजांचे संवर्धन
किल्ले वसंतगडावरून सोमवारी सायंकाळी श्रमिक गोजमगुंडे यांनी राज्यातील दुर्गप्रेमींशी आॅनलाईन संवाद साधत किल्ले वसंतगडसाठी ही साद घातली आहे. या वेळी दुर्गप्रेमी दीपक प्रभावळकर, तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते, जिजाबा मोहिते, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सागर माने, टीम वसंतगडचे रामभाऊ माळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर वसंतगडचे सरपंच अमित नलावडे यांची भेट सह्याद्री प्रतिष्ठानकडून घेण्यात आली. या वेळी त्यांनीही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
किल्ले वसंतगडवरील दक्षिण पश्चिम बाजूचा बुरूज मागील वर्षी पावसाळ्यात ढासळला होता. तेव्हापासून या बुरुजाच्या संवर्धनासाठी टीम वसंतगडकडून दर रविवारी विशेष मोहीम हाती घेतली जात आहे. त्याचवेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे हे आपल्या सहकाऱ्यांसह राज्य पुरातत्त्व खात्याकडे या बुरूजाच्या पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत होते. सोमवारी सायंकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधिस्थळी दर्शन घेत सह्याद्री प्रतिष्ठान आणि टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी पडझड झालेल्या बुरुजांच्या कामास श्रीफळ वाढवून प्रारंभ केला.
या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग दुर्गसेवक ज्योती शेडे, गौरव शेवाळे, संजय गोडगुद्री, सुशांत मोकाशी, अक्षय मेढे, सह्याद्री प्रतिष्ठान उरळी कांचन तसेच कऱ्हाड तालुका प्रशासक विश्वजित जाधव, चंद्रजित पाटील, राहुल जाधव हे दुर्गसेवक उपस्थित होते.
- चौकट
किल्ले वसंतगडाचा इतिहास
अफजलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन १६५९ साली किल्ले वसंतगड स्वराज्यात आणला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचेही वास्तव्य काही काळ किल्ले वसंतगडावर होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावची सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराराणी ही दोन रत्ने असून हिंदवी स्वराज्य संरक्षणात त्यांचे अनमोल असे योगदान आहे.
- चौकट
खासदारांकडून शिवकार्यास निधी
किल्ले वसंतगडवरून उतरल्यानंतर श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह दुर्गसेवकांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली. या वेळी श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे सांगून खासदारांनी सह्याद्री प्रतिष्ठानकडे वसंतगड संवर्धनासाठी निधीही सुपूर्द केला.
फोटो : २२केआरडी०९
कॅप्शन : किल्ले वसंतगड, ता. कऱ्हाड येथे ढासळलेला बुरूज उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.