काँग्रेस शिल्लक राहणार नाही
By Admin | Updated: February 16, 2017 23:15 IST2017-02-16T23:15:34+5:302017-02-16T23:15:34+5:30
चंद्रकांत पाटील आक्रमक : मुंढे-गोटे येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कडाडून टीका

काँग्रेस शिल्लक राहणार नाही
कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्यात भाजपला उमेदवार मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणी करणाऱ्या पृथ्वीबाबांच्या काँग्रेसलाच आज अनेक ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता भाजपवर टीका करताना जरा विचारपूर्वक बोलावे. आणि जिल्ह्यात औषधाला तरी काँग्रेस शिल्लक राहतेय का हे बघावे,’ अशी बोचरी टीका सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंढे-गोटे, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.
‘दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाजपची मदत घेतली होती. तसेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना आमची मदत चालली होती. मात्र, हेच नेते आजही भाजपवर जातीयवादी म्हणून टीका करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. आमची मदत घेतली तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का,’ असा खोचक सवालही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केला.
अतुल भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कमळ फुलल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कऱ्हाडला जाहीर सभा दिली होती. त्या सभेत ‘तुम्हाला आम्ही नगराध्यक्ष पदाची भेट देऊ,’ असे सांगितले होते. आज प्रचाराची धामधूम असतानाही आपण पुन्हा एकदा कऱ्हाडला सभा घेतलीत. यावेळी पंचायत समितीच्या सभापतिपदाची भेट आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. कऱ्हाड दक्षिणची खिंड लढविण्याची संधी तुम्ही विधानसभेला आम्हाला दिली आहे.’ (प्रतिनिधी)