काँग्रेस, रासप जोमात; राष्ट्रवादी मात्र कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:02 IST2016-03-24T21:33:31+5:302016-03-25T00:02:43+5:30
माण-खटाव मतदारसंघ : दमदार नेतृत्वाची गरज--कारण राजकारण

काँग्रेस, रासप जोमात; राष्ट्रवादी मात्र कोमात
नवनाथ जगदाळे-- दहिवडी --एकेकाळी माण तालुक्यातील सर्वच सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. आमदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यात लक्ष घातले तरीही अनेक सहकारी संस्था पंचायत समिती राष्ट्रवादीने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते; परंतु माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची अत्यंत वाताहात झाली तर उलट तालुक्यात काँग्रेस, रासप जोमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.माण तालुक्यात आजही काँग्रेसला टक्कर देणारी ताकद राष्ट्रवादीमध्ये असतानाही राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी फक्त पदापुरते उरले आहेत. गाव सोडून एकही नेता पक्षासाठी कार्य करावे, या मन:स्थितीत नाही. वर्षात आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. आरक्षण सोडत झाली की लगेच इच्छुक मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करतील. तत्पूर्वी पक्ष म्हणून सामुदायिक जबाबदारी राष्ट्रवादीमध्ये कोणीही स्वीकारत नाही.
भाजपाने कार्यकर्ता नोंदणीमध्ये एक पाऊल पुढे ठेवले आहे. शिवसेनेनेही दहिवडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नितीन बानुगडे-पाटल यांनी त्यांना रणजित देशमुख यांच्यासह सर्वांनी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. त्यांना पालकमंत्री विजय शिवतारे यांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कोट्यवधींची कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. तालुक्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ‘रासप’चे शेखर गोरे यांनी प्रत्येक निवडणुकीत आव्हान उभे केल्याने येथून पुढे दोन गोरे बंधूंचा संघर्ष तालुक्याला पाहावयास मिळत आहे.
पदाधिकाऱ्यांच्या किरकसाल, भांडवली या ठिकाणच्या सोसायट्या सोडल्या तर सर्वच ठिकाणी दोन गोरे बंधूंमध्ये लढत झाली आहे. सर्वच पक्षांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या-त्या पक्षाला याचा फायदा होणार आहे. (क्रमश:)
वरिष्ठांचे प्रयत्न अपुरे
वरिष्ठांनीही जेवढे हवे तेवढे प्रयत्न न केल्याने आज राष्ट्रवादीची ताकद असूनही वाताहात झाल्याचे चित्र आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून, हे दोन्ही पक्ष जोमात असताना राष्ट्रवादी मात्र कोमात गेल्याचे चित्र आहे.
पोळ तात्यानंतर एकाही नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी चिंतन बैठक घेतली नाही. पदाधिकारी मात्र पद भोगण्याइतपत राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीला कोणाच्या तरी दावणीला जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास घातक ठरू शकतो. एकेकाळी डझनभर भरणा असलेल्या राष्ट्रवादीला मरगळ आली कशी, याचे चिंतन होणे गरजेचे आहे.