‘काँगे्रस’ सदस्यांची कोयनेत ‘आकाडी’!
By Admin | Updated: July 31, 2016 00:04 IST2016-07-31T00:04:52+5:302016-07-31T00:04:52+5:30
घड्याळाचे काटे फिरले उलटे : शिवाजीराव शिंदेंवरील अविश्वास ठराव राष्ट्रवादीच्या अंगलट

‘काँगे्रस’ सदस्यांची कोयनेत ‘आकाडी’!
प्रमोद सुकरे / कऱ्हाड
सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँगे्रसची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँगे्रसने कोयनेत नेऊन ठेवलेल्या सदस्यांपैकी एकही मासा गळाला न लागल्यामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी तोंडघशी पडली. अविश्वास ठरावाच्या आदल्यादिवशीच कोयनेत दाखल झालेल्या सदस्यांचा राष्ट्रवादीची जिरवण्याइतपत आकडा गाठला. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळीच एका रिसॉर्टवर काँगे्रसच्या या सदस्यांनी जणू ‘आकाडी’च साजरी केली.
राष्ट्रवादी काँगे्रस अंतर्गत वादामुळे जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून घडतंय-बिघडतंय असे चित्र पाहायला मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणजे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांचा राजीनामानाट्य. शिंदेंनी थेट कोर्टात आव्हान देत, ‘तो मी नव्हेच प्रमाणेच्या भूमिकेत जाऊन हा माझा राजीनामाच नाही,’ असे सांगत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. त्यामुळे ज्यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता, ते राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अस्वस्थ झाले. त्यातूनच अविश्वास ठरावाचा दुसरा अध्याय सुरू झाला; पण शनिवारी हा प्रयोग पुरता फसल्याने राष्ट्रवादीत गलबला निर्माण झाला आहे.
सुभाषराव नरळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसांतच नेत्यांच्या सूचनेनंतर हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्यासाठी शनिवार, दि. ३० रोजी विशेष सभाही बोलविण्यात आली. मात्र, ठराव मंजूर करण्यासाठी लागणारे संख्याबळ कमी पडत असल्याची जाणीव नेत्यांना झाली. आजवर काँगे्रसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेपासून जाणीवपूर्वक चार ‘हात’ लांब ठेवणारे नेतेच आता काँगे्रसच्या सदस्यांना मदतीचा ‘हात’ मागू लागले.
तेव्हाच काँगे्रस सदस्यांनी राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे ओळखून आजवर फसविण्याऱ्या अन् झुलवत ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला हिसका दाखवायची हीच वेळ आहे, हे ओळखले. शुक्रवारी दुपारी विरोधीपक्ष नेते जयवंत जगताप अन् पक्षप्रतोद अविनाश फाळके यांनी कऱ्हाडात पत्रकार परिषद घेऊन काँगे्रस सदस्यांसाठी विशेष सभेला गैरहजर राहण्याचा व्हीप काढला असल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी काय घडणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती.
एकाबाजूला विश्रामगृहात ही पत्रकार परिषद सुरू असतानाच कऱ्हाडातील एका हॉटेलमध्ये काँगे्रसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा ‘संगम’ व्हायला सुरुवात झाली. सायंकाळी अपेक्षित सर्व सदस्य आल्यानंतर गाड्यांचा ताफा कोयनानगरला रवाना झाला.तेथे एका रिसॉर्टमध्ये या साऱ्यांची खास बडदास्त ठेवण्यात आली होती.
रात्री खासदार उदयनराजे भोसले समर्थक असणारे जिल्हा परिषद सदस्यही कोयनेत दाखल झाले अन् आकड्यांची गोळाबेरीज झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आता उलटे फिरणार याची खात्री पटली. मग उपस्थित सर्वांनी आनंदाप्रीत्यर्थ आकाडी साजरी केली.
तरीपण शनिवार सकाळपासून कोयनेत मुक्कामी असणाऱ्या या साऱ्या सदस्यांचे लक्ष साताऱ्याच्या घडामोडींकडे होतेच. तेथे राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ जमवता आले नसल्याची वार्ता भ्रमणध्वनीवरून मिनिटा-मिनिटाला मिळत होतीच; पण दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले. त्यामुळे काँगे्रस अन् राष्ट्रवादी समर्थक सदस्यांच्यात आनंदी व समाधानाचे वातावरण पसरले.
मोहीम फत्ते झाल्याची खात्री होताच. आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील या दोघांनी कोयनानगर गाठले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांचा विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर कोयनेत आलेल्या सर्व सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेत घराकडे वाटचाल केली.