होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अन्यथा गुन्हा दाखल; घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका सतर्क
By सचिन काकडे | Updated: May 14, 2024 18:59 IST2024-05-14T18:57:25+5:302024-05-14T18:59:54+5:30
तीन दिवसांची मुदत,

होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अन्यथा गुन्हा दाखल; घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका सतर्क
सातारा : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका सतर्क झाली असून, पालिकेने शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली. होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी (दि. १३) एका पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने १४ जणांना आपला जीव गमवावा लागला तर, ७५ हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. सातारा पालिका प्रशासनानेदेखील खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या जागेवर व खासगी मिळकतींवर लावणाऱ्या होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस बजावली.
होर्डिंगधारकांनी ज्या इमारतीवर होर्डिंग उभारले आहे त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, मिळकतधारकांशी केलेला करारनामा, मिळकतदार व सातारा पालिकेने होर्डिंगसाठी दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र आदी दस्तऐवज तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, असे नोटिसीत नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून होर्डिंग जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे.