बेल्जियमच्या विद्यार्थ्यांचा संवाद
By Admin | Updated: November 23, 2014 23:47 IST2014-11-23T20:53:12+5:302014-11-23T23:47:18+5:30
जिल्हा परिषद शाळा : शालेय वातावरण, शिक्षणपद्धतीची घेतली माहिती

बेल्जियमच्या विद्यार्थ्यांचा संवाद
कुडाळ : ग्रामीण संस्कृतीचा तसेच ग्रामीण शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या बेल्जियमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोलेवाडी, ता. जावळी प्राथमिक शाळेला भेट दिली. या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर, शिक्षणपद्धती तसेच विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. विद्यार्थ्यांना अवगत असलेल्या इंग्रजी भाषेचे कौतुक केले. त्यांच्या इंग्रजी बोलण्याने भारावूनही गेले.
पाचगणी येथील सेंट झेवीयर स्कूलला भेट देऊन त्यांनी प्राथमिक शाळेला भेट देण्यासाठी कोलेवाडी शाळा निवडली. विद्यार्थ्यांनी मुलांचा इंग्रजीचा पाठही घेतला. मुलांची स्वच्छता, स्वच्छ शालेय परिसर पाहून बेल्जियमचे विद्यार्थी भारावून गेले. तसेच शैक्षणिक साहित्यांचे वाटपदेखील त्यांनी यावेळी केले.
मुख्याध्यापिका पूनम उगले यांनी ग्रामीण संस्कृती, शिक्षण पद्धतीविषयी माहिती दिली. यावेळी माधुरी साळुंखे, एस. व्ही. जाधव, व्यवस्थापन अध्यक्ष शिवाजी नवसरे, सरपंच सीताबाई नवसरे, दिलीप भालेघरे, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)