लोकभावना दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरू : शेलार
By Admin | Updated: January 2, 2015 00:22 IST2015-01-01T21:35:33+5:302015-01-02T00:22:51+5:30
‘ईएसझेड’मुळे मानवी जीवनावरच संक्रांत

लोकभावना दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरू : शेलार
पाटण : ‘निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या पाटण तालुक्याने निसर्गसौंदर्याचा ठेवा जीवापाड जपला आहे़ पर्यावरणसमृद्ध असणाऱ्या तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदान जाचक नियमांमुळे शाप ठरत
आहे़ विविध प्रकल्प आणि झोन यामुळे येथील मानवी जीवनावरच संक्रांत येत आहे़ ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनच्या जाचक अटींविरोधात गावागावांत प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, लोकभावना निदर्शनास आणून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू,’ असा इशारा मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी बैठकीत दिला़
कोयनानगर येथे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमधील ९५ गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी पंचायत समितीच्या सभापती संगीत गुरव, सदस्या शोभा कदम, रामभाऊ मोरे, बाळा कदम, बापू देवळेकर, रमेश जाधव, मनीषा चौधरी, पाटणचे वनक्षेत्रपाल जी़ एऩ कोले, इको सेन्सिटिव्ह झोनचे नोडल आॅफिसर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेलार म्हणाले, ‘शासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे डोंगरकपारीतील गावे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत़ इको सेन्सिटिव्ह झोनमधील बंधणे माणसाला आदिवासी जीवन जगण्यास भाग पाडणारे आहे़
शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा़ ग्रामपंचायतींनी ग्रामसभांद्वारे ठराव करून आपल्या भावना कळवाव्यात; अन्यथा संघर्ष अटळ आहे़ कस्तुरीरंगन समितीच्या शिफरशी ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये ९५ गावांसाठी अन्यायकारक असून, ग्रामस्थांनी त्या फेटाळून लावाव्यात़ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अहवालाचे फेरअवलोकन करणाऱ्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीही ग्रामस्थांना अमान्य आहेत. (प्रतिनिधी)