गुंडगिरीपुढे महाविद्यालय प्रशासनही हतबल

By Admin | Updated: August 24, 2014 00:29 IST2014-08-24T00:29:04+5:302014-08-24T00:29:04+5:30

पालक चिंतातूर : शिक्षणासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज

The college administration is also behind Gundagiri | गुंडगिरीपुढे महाविद्यालय प्रशासनही हतबल

गुंडगिरीपुढे महाविद्यालय प्रशासनही हतबल

सातारा : ज्या कर्मवीरांनी सातारच्या मातीतून रयत शिक्षण संस्थेच्या इवल्याशा रोपट्याचा वेलू गगनावरी पोहोचविला. सर्वांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. आज त्यांनीच स्थापन केलेल्या सातारच्या सायन्स कॉलेज परिसरात गुंडगिरी बोकाळू लागलीय. येथे टवाळखोरांचा खुलेआम धिंगाणा सुरू आहे. रोज मारहाण, येता-जाता मुलींना चिडविणे अशा प्रकारांना विद्यार्थी अक्षरश: कंटाळलेत. विशेष म्हणजे सर्व माहीत असूनही कॉलेज प्रशासनही गुंडगिरीपुढे हतबल झालंय. तर मुलींना कॉलेजला पाठविणे आता सुरक्षित राहिले नसून त्यांना पुढे शिकवावे का, असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.
लल्लन बॉईज नामक एक टोळकं मुलींना गाड्या आडव्या मारणं, अश्लील भाषेत बोलणं असे घाणेरडे प्रकार करत आहेत. कॉलेजला येताना रस्त्यात ही मुलं मुद्दाम त्रास देण्यासाठी गाडी आडवी मारतात. तोंडाला रूमाल बांधला असेल तर ‘रूमाल सोड जरा चेहरा दाखव, वहिनी चालली बघ!, ही वहिनी कुणाची?, फटीतनं काय बघतीयास?, वॉवऽऽ’ असे अर्वाच्च भाषेत टोमणे मारले जातात. ते ऐकून आता तर आम्हाला आमच्या शरीराचीही लाज वाटायला लागलीय... अन्यायाविरोधात लढायचंय; पण आम्हाला साथ हवीय... आधार हवाय, ही अगतिकता आहे रोज मनात भीती दाबून शिकणाऱ्या मुलींची.
आपल्या महाविद्यालयात मुलींची अशी कुचंबणा होतेय याकडे मात्र महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत आहे. खुद्द शिक्षकही या मुलांची मुजोरी सहन करत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत महाविद्यालय प्रशासनाला सांगितले; मात्र त्यांनीही हात वर करत ‘तुमची जी काय भांडणं असतील ती कॉलेज गेटच्या बाहेर करा, कॉलेजमध्ये ते चालणार नाहीत,’ अशी बचावात्मक भूमिका ते घेत आहेत. काही शिक्षकांनाही या टवाळखोरांनी अरेतुरेची भाषा वापरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेची प्रतीक्षा
पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी ‘या गुंडांना ठोकून काढा,’ अशी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मात्र, ‘जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत साताऱ्यातील महिला सुरक्षित राहतील,’ असं नेहमी मोठ्या अभिमानाने सांगणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अद्याप या गुंडगिरीप्रकरणी कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. सर्वसामान्य सातारकरांच्या मुलीबाळींना महाविद्यालय परिसरात राजरोसपणे होणारा त्रास उघडकीस येऊनही साताऱ्याचे लोकप्रतिनिधी गप्प का, असा आश्चर्यजनक सवालही या महाविद्यायीन तरुणाईने केला आहे. ‘कार्यकर्त्यांचे हितसंबंध’ अन् ‘मतांचे राजकारण’ यापेक्षाही सातारकरांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, असाही सूर पालकांनी काढला आहे.



पोलीस बंदोबस्त तैनात
महाविद्यालयातील गुंडगिरीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. शनिवारी प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात तीन पोलीस हवालदार गैरप्रकारावर नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही दुरुस्तीला गेले की चोरीला?
सायन्स कॉलेजमध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते दिसेनासे झाले आहेत. याबाबत काही मुलांनी महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी केली असता कोणी सांगतेय की दुरुस्तीला दिलेत, तर कोणी सांगतेय ते चोरीला गेलेत. नेमके सीसीटीव्ही कॅ मेऱ्याचे झाले काय?
कारवाई का होत नाही?
कोणी त्रास देत असेल त्याची तक्रार पोलिसात द्या, कारवाई करू, असे पोलिसांकडून सांगितले जाते. मग संबंधित मुलाने मारहाण केल्याची तक्रार देऊनही अद्याप त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: The college administration is also behind Gundagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.