गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By Admin | Updated: November 27, 2014 23:58 IST2014-11-27T23:19:38+5:302014-11-27T23:58:10+5:30

राम हंकारे यांचे मत --थेट संवाद

The collective effort needed to control gastro | गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

प्रश्न : गॅस्ट्रोची जिल्ह्यात नेमकी कधी आणि कशामुळे सुरुवात झाली?
उत्तर : ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ नाही, विशेषत: मिरजेमध्ये याची साथ आलेली आहे. १९ नोव्हेंबर रोजी महापालिकेने सर्व्हे केला. यामध्ये रुग्ण आढळून आले. तसे आॅगस्टपासून रुग्ण आढळत गेले. गॅस्ट्रो हा मुळात दूषित पाण्यामुळे होतो. मैलामिश्रित पाण्याच्या वापराने याची सुरुवात होते. त्यानंतर एकमेकाच्या संपर्काने ही साथ सुरु होते. महापालिका क्षेत्रातही पिण्याची पाईपलाईन व ड्रेनेज पाईपलाईन जवळजवळ असल्यानेच दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने ही साथ आली आहे.
प्रश्न : गॅस्ट्रो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत?
उत्तर : मुळात दूषित पाण्यापासून कसे दूर राहता येईल, हे पाहिले पाहिजे. पाणी उकळून, थंड करुन पिले पाहिजे. पाण्याला दुर्गंधी येत असेल तर, तात्काळ त्या पाण्याचा वापर टाळला पाहिजे. केवळ नळालाच नव्हे, तर घरामध्येही पाणी दूषित होऊ शकते. शौचास जाऊन आल्यानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात ठेवले पाहिजे. दहा लिटर पाण्यात दोन थेंब मेडिक्लोर औषध टाकून पाणी पिले पाहिजे. बाहेरील, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे.
प्रश्न : गॅस्ट्रो झाल्यानंतर काय उपाययोजना कराव्यात?
उत्तर : रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे. अर्थात ते उकळून थंड केलेले असले पाहिजे. लिंबाचे सरबत वेळोवेळी घेतले पाहिजे. शरीरातील पाणी संपणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ओआरएस पावडर मिळसून पाणी घेतले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करुन घेतला पाहिजे. सलाईन घेतले पाहिजे. यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा राहणार नाही.
प्रश्न : आपल्याकडे सध्या गॅस्ट्रोची स्थिती कशी आहे?
उत्तर : ग्रामीण भागात गॅस्ट्रो नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रो आहे, मात्र तो नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रातील गॅस्ट्रोबाबत बोलण्याचा अधिकार मला नाही. मात्र गॅस्ट्रोवर नियंत्रण आणणे ही सामूहिक जबाबदारी आहे. यामध्ये महापालिका आरोग्य यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवक, इंडियन मेडिकल असोसिएशन आदी सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. सामूहिक प्रयत्नांशिवाय यावर नियंत्रण येणार नाही. जनजागृतीही व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. लोकांमधील गैरसमजही दूर करायला हवेत. लोकांमधील भीती दूर केली पाहिजे. इतर आजारांमुळेही रुग्ण आपल्याला गॅस्ट्रो झाल्याची भीती सध्या बाळगत आहेत. त्यामुळे ही भीती दूर करुन गॅस्ट्रोची लक्षणे आणि उपाययोजना याबाबतही व्यापक जनजागृती झाली पाहिजे.
प्रश्न : गॅस्ट्रोवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करीत आहे?
उत्तर : ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. पाणवठे शुध्दीकरणाचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. शुध्दीकरण पावडरीची मात्रा वाढवली आहे. महापालिकेला आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक दिले आहे. मी स्वत: यावर देखरेख करीत आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाला पुरेसा औषधसाठा जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेच्या मागणीप्रमाणे डॉक्टर, कर्मचारी, औषध साठ्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गॅस्ट्रोची साथ रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. औषधांची मागणी झाल्यास तात्काळ पुरवली जाणार आहे. गॅस्ट्रोच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
प्रश्न : नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
उत्तर : हा प्रश्न स्वच्छतेशी निगडित आहे. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. घरामध्ये पाणी दूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शौचालय स्वच्छ राहील, त्याचा पिण्याच्या पाण्याशी संबंध येणार नाही, अशी दक्षता घेतली पाहिजे.
४अंजर अथणीकर


महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. पाचशे रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. प्रशासनाने तीन रुग्ण दगावल्याची कबुली दिली असली तरी, प्रत्यक्षात आकडा अधिक आहे. गॅस्ट्रो कशामुळे होतो, तो होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहेत, झालेल्यांनी काय उपाय करावेत, ही साथ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करीत आहे, आदीविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याशी ‘लोकमत’ने गुरुवारी साधलेला संवाद...

Web Title: The collective effort needed to control gastro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.