उरमोडीच्या पाण्यासाठी औंधसह सोळा गावांत बंद
By Admin | Updated: August 17, 2014 00:21 IST2014-08-17T00:21:49+5:302014-08-17T00:21:49+5:30
मोर्चा काढून निषेध : सांगलीला पाणी पळविल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया

उरमोडीच्या पाण्यासाठी औंधसह सोळा गावांत बंद
औंध : औंधसह १६ गावांच्या शेती पाणीप्रश्नी शनिवारी गावे अधिक आक्रमक झाली. सांगली जिल्ह्यातील ढाणेवाडीसह ७ गावांना दिल्या जाणाऱ्या उरमोडीच्या पाण्याचा आदेश त्वरित रद्द करावा व शासनाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी औंधसह १६ गावे बंद ठेवून मोर्चा काढून शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला.
सकाळी राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली औंध गावातून निषेध मोर्चा काढून ग्रामस्थ, युवक, शेतकऱ्यांनी निषेध केला.
यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.’ ‘पाणी द्या, नाही तर चले जाव’ अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला.
हा निषेध मोर्चा बाजार पटांगण, बालविकास, हायस्कूल चौक, होळीचा टेक, केदार चौक, मारुती मंदिर मार्गे काढण्यात आला. यावेळी गावातील सर्व बाजारपेठा, आर्थिक व्यवहार, हॉटेल्स, दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
त्यानंतर झालेल्या निषेध मोर्चात बोलताना दत्तात्रय जगदाळे म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधींकडून या भागातील जनतेची फसवणूक होत असून लोकप्रतिनिधी वर विश्वास न ठेवता आता जनतेने ही लढाई हातात घेण्याची वेळ आली असून यापुढील काळात कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी तरुणाई व या भागातील जनता, शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. जिल्ह्याचे हक्काचे पाणी सांगलीकर पळवत असून ही जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेच्यादृष्टीने खेदाची बाब आहे.’
यावेळी रामभाऊ घार्गे, नंदकुमार रणदिवे, धनाजी आमले यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.
मोर्चा व निषेध सभेत पृथ्वीराज भोकरे, नंदकुमार रणदिवे, सागर जगदाळे, धनाजी आमले, जयसिंग घार्गे विजय हिंगे, दादा माळी, नामदेव भोसले, विनोद कदम, सागर चव्हाण, सागर गुरव, मच्छिंद्र सावंत, वसंतराव जानकर, गणेश चव्हाण, ग्रामस्थ, युवक, शेतकरी विविश युवा मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, परिसरातील १६ गावांतील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांनी याचा निषेध केला. उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्यास देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद खटाव तालुक्यात
उमटले. (वार्ताहर)