हजारो फूट खोल दरी, कड्यावर क्लाइंबिंग-रॅपलिंग
By Admin | Updated: January 7, 2015 23:54 IST2015-01-07T22:50:31+5:302015-01-07T23:54:08+5:30
सह्याद्री ट्रेकिंग : लोण्यावळ्याजवळ केले साहस

हजारो फूट खोल दरी, कड्यावर क्लाइंबिंग-रॅपलिंग
सातारा : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री ट्रेकिंग या संस्थेच्या गिर्यारोहकांनी नवीन वर्षात साहसी थरारक क्लायबिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग केले. त्यासाठी लोणावळ्याजवळील ‘ड्युक्स नोज’ या भव्य भिंतीसारख्या सरळ उंच, उभ्या कड्याची निवड केली.
खंडाळा घाटातून मुंबईला जाताना अनेकांनी याचे रौद्ररूप पाहिले आहे. हा कडा नुसता जवळ जाऊनही पाहणं सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवणारं आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘ड्यूक्स नोज’चं टोक व त्यासमोरील हजारो फूट खोल दरीचा प्रचंड घसारा पाहूनच डोळे फिरतात. या कड्याच्या चढाईमार्गापर्यंत जाताना सुद्धा धोकादायक दिव्य पार करावं लागतं. कड्याच्या पोटात निर्माण झालेल्या निमुळत्या मार्गावरून चालत, तोल सावरत, सरपटत, वाकून काळजीपूर्वक चालावं लागतं. एक चूकही मृत्यूचे दार दाखवते. ‘भयानक’ या शब्दाची प्रचिती तेथे गेल्यावरच कळते. अशा या कड्यावर येथील सह्याद्री ट्रेकिंगचे कैलास बागल, अमीर नदाफ, प्रतीक साळुंखे, अनिकेत कोदे, प्रणव महामुने यांनी चढाई करणे, कडा उतरणे, पुन्हा जुमरिंग करत चढण्याचा निश्चय केला. त्यानुसार प्रथम कैलास बागल यांनी चढाई मार्गाची सुरुवात करून दिली. त्यानंतर अमीर नदाफने आघाडी सांभाळत २७० फुटांपर्यंतची चढाई यशस्वी केली. त्याला इतरांनी साथ दिली.
या साहसवीरांचे कौतुक होऊ लागले आहे. (प्रतिनिधी)
तोंडभरून कौतुक...
‘ड्युक्स नोज’ कड्यावर पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी वरील सह्याद्रीवीरांचे तोंडभरून कौतुक केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल साताऱ्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या गिर्यारोहकांचा सत्कार करून गौरव केला. लोणावळ्याजवळील हा कडा जवळ जाऊनही पाहणं सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवणारं आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘ड्यूक्स नोज’चं टोक व त्यासमोरील हजारो फूट खोल दरीचा प्रचंड घसारा पाहूनच डोळे फिरतात. या कड्याच्या चढाईमार्गापर्यंत जाताना सुद्धा धोकादायक दिव्य पार करावं लागतं. कड्याच्या पोटात निर्माण झालेल्या निमुळत्या मार्गावरून चालत, तोल सावरत, सरपटत, वाकून काळजीपूर्वक चालावं लागतं.