जाधववाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:59+5:302021-09-05T04:43:59+5:30
चाफळ : चाफळ विभागातील जाधववाडी (ता. पाटण) येथे ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे हटविली. ...

जाधववाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम
चाफळ : चाफळ विभागातील जाधववाडी (ता. पाटण) येथे ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे हटविली. तसेच ग्रामदैवत जानाई मंदिराच्या परिसरात श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबविली. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत तोंडावर सुरक्षा मास्क लावत ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून जानाई मंदिर तसेच गावचा परिसर चकाचक केला.
जाधववाडी ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे मंदिर व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले होते. मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गावातील युवक व महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील व मंदिर परिसराची स्वच्छता केली.
दरम्यान, गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावात बैठक घेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत हे काम करण्याचे एकमताने ठरवण्यात आले. होते. त्यानुसार गावातील ग्रामस्थांनी खोरे, टिकाव, कुऱ्हाड, खुरपे घेऊन मंदिर परिसरात असणारी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीच्या बाजूची वाढलेली झाडेझुडपे तसेच अनावश्यक झाडांच्या छोट्या फांद्या काढल्या. येथील युवक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना विषाणू महामारीच्या कालावधीत स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून समाजाप्रती असलेला जिव्हाळा सर्वांना दाखवून दिला. जाधववाडीकरांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.