कोरोना गेल्याच्या भ्रमात नागरिकांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:12+5:302021-06-27T04:25:12+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्ण संख्येमध्ये कमालीची घट झाली. जिल्हा आणि तालुका ...

कोरोना गेल्याच्या भ्रमात नागरिकांचा वावर
रामापूर : पाटण तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्ण संख्येमध्ये कमालीची घट झाली. जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्यावतीने निर्बंध कमी केले. त्यामुळे पाटण तालुक्यात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे तालुक्यात बाधित रुग्ण संख्या कमी होत नाही, ती स्थिर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी कोरोना गेला या भ्रमात राहू नये. निष्काळजीपणा कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या जिवावर बेतू शकते. तिसरी लाट येऊन द्यायची नसेल, तर आता पासून खबरदारी घेणे गरजेचे आहे
पाटण तालुक्यात आणि शहरात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा अधिक जाणवला. याचे कारणही नागरिकांचा बेफिकीरपणा तालुका प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. तालु्का प्रशासनाच्यावतीने कठोर कारवाई केल्यानेच दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत गेला. त्यामुळे तालुका अनलॉक करण्यात आला; मात्र या अनलॉकमध्ये नागरिक कोणती खबरदारी घेताना दिसत नाहीत. बिनधास्त पार्टी, बिनधास्त खरेदी, लग्नानंतरचे रिसेप्शन कार्यक्रम तर वाढदिवस कार्यक्रम बिनधास्त करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात कोणतेही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत.
तालुक्यात आणि शहरात दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या स्थिर आहे. वाढत नाही आणि कमीही होत नाही. यामुळे आगामी काळात नागरिकांनी स्वत:हून आपली, कुटुंबाची त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत काळजी घेतली नाही, तर पुन्हा रुग्णसंख्या वाढून लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. यामुळे वेळीच सावध होऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
चौकट
समारंभांवर आवर महत्त्वाचा
लग्न समारंभ, वाढदिवस या कार्यक्रमात जाण्याचे टाळा, फोनवरून त्यांना संवाद साधत शुभेच्छा देता येतात. आपण स्वतःची, आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधित आकडेवारी
बाधित ५३ (६,८४७)
कोरोनामुक्ती ४२ (६,१४२)
मृत्यू ० (२७४)