बाराशे स्वयंसेवकांचे संचलन

By Admin | Updated: January 12, 2015 01:31 IST2015-01-12T01:11:11+5:302015-01-12T01:31:43+5:30

संघाचे शक्तिप्रदर्शन : साताऱ्यात प्रथमच मोठा सहभाग; महारांगोळ्या, पुष्पवृष्टी, आतषबाजी

Circulation of twelve hundred volunteers | बाराशे स्वयंसेवकांचे संचलन

बाराशे स्वयंसेवकांचे संचलन

सातारा : ‘जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय...’ यासारख्या घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले. निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे. यामध्ये सुमारे १२०० जण सहभागी झाले होते. प्रथमच मोठ्या प्रमाणावर हे संचलन झाले. या पथसंचलनादरम्यान महारांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रविवारी दुपारी ३ वाजता शहरातून प्रथमच मोठ्या स्वरूपात झालेल्या भव्य पथसंचलनाच्यावेळी शेकडो स्वयंसेवक संचलन मार्गावर आले आणि त्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. यावेळी सातारकरांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महारांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि त्यात होत असलेले स्वयंसेवकांचे नेत्रदीपक संचलन अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. आज यावर्षी प्रथमच झालेल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील स्वयंसेवकांच्या एकत्रित पथसंचलनात जिल्ह्यातून सुमारे १२०० स्वयंसेवक संघाच्या गणवेशात या संचलनात सहभागी झाले होते.
संघाचे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख सुहास हिरेमठ यांच्यासह जिल्हा संघचालक डॉ. सुभाष दर्भे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोटेश्वर मैदान येथे वाहिनी अर्थात स्वयंसेवकांच्या समूहाचे नेटके व शिस्तबद्ध कवायत रांगा लावून झाल्यावर संघाचा ध्वज उभारण्यात आला. तसेच ध्वजवंदन व प्रार्थना होऊन घोषपथकाने अग्रभागी या संचलनाचा ताबा घेतल्यावर हे संचलन सुरू झाले.
संचलनाच्या मध्यभागी मुलांनी सजविलेल्या विशेष वाहन रथात छ. शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजी व डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण १३ समूहातील पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काळी टोपीसह गणवेशधारी व हातात दंड असलेले हे स्वयंसेवक स्वदेश रचनांवरील घोष पथकांच्या तालावर संचलनात मार्गक्रमण करत होते.
सातारा जिल्ह्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी येथील संघाची घोष पथके व स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाली होती. संघाचे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख सुहास हिरेमठ यांच्या मार्गदर्शनानंतर या संचलन सोहळ्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Circulation of twelve hundred volunteers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.