दुर्लक्षित साईटपट्टीवर अडकला चक्क टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:41+5:302021-06-20T04:26:41+5:30
मायणी : मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावरील पवारमळा ते गुंडेवाडी (मराठा नगर) दरम्यानचे राज्यमार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले, ...

दुर्लक्षित साईटपट्टीवर अडकला चक्क टँकर
मायणी : मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावरील पवारमळा ते गुंडेवाडी (मराठा नगर) दरम्यानचे राज्यमार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले, मात्र साईटपट्ट्या व्यवस्थित न केल्याने शनिवारी चक्क यामध्ये टँकर अडकून बसल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प राहिली.
याबाबत माहिती अशी की, मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावरील मल्हारपेठपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पवारमळा ते गुंडेवाडी (मराठा नगर) दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटर अंतराचे राज्य मार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, तेव्हापासून राज्यमार्गाच्या साईडपट्ट्यांचे काम पूर्ण झाले नव्हते तर पूर्ण करून घेण्याचे कामही संबंधित अधिकाऱ्यांनी केले नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामध्ये या मार्गाच्या साईडपट्ट्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. अनेक वाहने या चिखलामध्ये घसरत होती तसेच डांबरी रस्ता सोडून खाली कोणी उतरायचे, यावरून वाहनचालकांमध्ये शाब्दीक वादावादी होत आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘मल्हारपेठ-पंढरपूर रस्ता झाला मात्र साईडपट्ट्या दुर्लक्षित’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध होऊन बारा दिवस उलटले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या साईडपट्ट्या व्यवस्थित करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे शनिवारी या राज्यमार्गाच्या साईडपट्टीवर चक्क टँकर अडकून बसला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. संबंधित वाहनचालकाने टॅंकर काढण्यासाठी क्रेन बोलावली व टँकर बाहेर काढला. मात्र, टॅंकर फसल्याने संबंधित वाहनचालकाचा वेळ व पैसाही अनावश्यक खर्च झाला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मोठा अनर्थ व जीवितहानी होण्यापूर्वी या साईडपट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट
याच मल्हारपेठ - पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून पवारमळा, गुंडेवाडी (मराठा नगर), चितळी दरम्यान मोठ्या प्रमाणात काटेरी बाभळी दोन्ही बाजूंनी वाढल्या आहेत. त्यामुळे साईडपट्ट्यांबरोबरच या काटेरी बाभळींचा सामनाही वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यामुळे साईडपट्टीबरोबर काटेरी बाभळी काढण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.
१९ मायणी-टँकर
मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावर गुंडेवाडी (मराठा नगर)जवळ शुक्रवारी साईडपट्टीवर टॅंकर अडकला होता. (छाया : संदीप कुंभार)