चायनीज मांजा ठरतोय घातक

By Admin | Updated: August 20, 2015 21:43 IST2015-08-20T21:43:31+5:302015-08-20T21:43:31+5:30

दोघांचा मृत्यू : पक्षीही जखमी; बंदीची नागरिकांतून मागणी

The Chinese fanatic is fatal | चायनीज मांजा ठरतोय घातक

चायनीज मांजा ठरतोय घातक

नसीर शिकलगार-फलटण चायनीज मांजाने दोघांचा झालेला मृत्यू व अनेकजण जखमी झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे मांजावर तातडीने बंदी घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
नागपंचमीचा सण पतंगोत्सव साजरा करून केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आबालवृद्ध पतंग उडविण्यात मग्न असतात. पतंगाच्या शर्यती लावून सरस ठरण्याचे प्रकार चालू असतात. पतंग उडविताना प्रथम मांजा चांगल्याप्रतीचा असावा, याकडे सर्वांचे लक्ष असते. काही वर्षांपूर्वी मांजा बनविण्याची क्रेज असायची. काचा कुटून त्यापासून मांजा बनविला जायचा. रात्रीच्या वेळेस मोकळ्या मैदानात किंवा रस्त्याच्या कडेने कांचीमांजा बनविण्यासाठी रात्री जागल्या जात. मांजा बनविण्यातही मजा असे. मांजा बनविणे एन्जॉय केले जायचे; मात्र काळ जसजसा बदलत गेला तसतसा मांजा आणि पतंगामध्येही बदल होत गेले. कागदीऐवजी प्लास्टिक किंवा पावसाळी कागदाच्या पतंगा आल्या. या पतंगा लवकर फाटत नसल्यामुळे या पतंगाला मागणी वाढली गेली. तसाच प्रकार मांजाच्या बाबतीत झाला. न कापणारा व धारदार असा रेडिमेड चायनीज मांजा बाजारात आला. स्वस्तात व रेडिमेड मजबूत धारदार असा मांजा लगेच मिळत असल्याने या मांजावर उड्या पडू लागल्या.
या मांजामुळे अनेकपक्षांना प्राण गमवावे लागले. मात्र पतंग उडविणाऱ्यावर याचा परिणाम झाला नाही. मात्र, नागपंचमीच्या दिवशी दोघांचा मांजाने गळा कापून झालेल्या मृत्यूने तसेच अनेकजण जखमी झाल्याने सर्वांचे डोळे खाडकन उघडले गेले. अनेकांनी स्वत:हून पतंग उडविणे बंद केले तर पोलिसांनी तातडीने पतंग उडविण्यावर बंदी घालताना चायनीज मांजा जप्त करण्याचे किंवा कापण्याचे प्रकार सुरू केले.
फलटण शहरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पतंगाचा उत्सव तर यात्रेप्रमाणे साजरा केला जातो. मात्र, सर्वांनी मुरड घालून चायनीज मांजा वापरणे बंद केले. मांजाने गळा कापणे म्हणजे एकप्रकारची हत्या केल्यासारखाच प्रकार असल्याचे मानले जात आहे. शसनाने यावर बंदी घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.

सध्या फलटण तालुक्यात नागपंचमी सणाच्या निमित्ताने पतंग उडविण्यात येत आहेत. या पतंगासाठी विविध प्रकारच्या मांजाचा वापर करण्यात येत आहे. पण, चायनीज मांजाने मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रकारही घडला आहे. तसेच यामुळे पक्षीही जखमी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. हाताला जखमा होत आहेत. त्यामुळे अशा मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांचीही भूमिका महत्वाची ठरणारी आहे.
- उध्दव बोराटे, फरांदवाडी

नागपंचमी सणाच्या काळात पतंग उडविण्यात येतात. या पतंगासाठी मांजाचा वापर करण्यात येतो. पण, चायनीज मांजाने दोघांजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामुळे अनेक पक्षीही जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याची गरज आहे. तसेच पोलिसांनीही पतंग उडविणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
- दशरथ फुले, फलटण

Web Title: The Chinese fanatic is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.