चिमणराव कदम यांना मोबाईलवरून धमकी
By Admin | Updated: July 7, 2014 23:06 IST2014-07-07T23:05:20+5:302014-07-07T23:06:40+5:30
पोलिसांत गुन्हा : ‘राजेंना विरोध का करतो, सोडणार नाही’ म्हणत दमदाटी

चिमणराव कदम यांना मोबाईलवरून धमकी
फलटण : ‘राजेंना विरोध का करतो, सोडणार नाही,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत माजी आमदार चिमणराव कदम यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
फलटण शहरात वाढत्या गुंडगिरीचा, चोरट्यांचा त्रास जनतेला होत असतानाही तसाच त्रास आता लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नेत्यांनाही धमकाविण्यापर्यंत होऊ लागल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर व कुटुंबीयांना शनिवारी (दि. ५) मारहाण झाली होती. तसेच सातारा येथील एका पत्रकाराला पिस्तूल लावून धमकावण्याचाही प्रकार घडला होता.
याचा निषेध म्हणून आज सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. ७) दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी माजी आमदार चिमणराव कदम यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने मोबाईल (७७१९९२०९०८)वरून फोन करून ‘तू आमच्या राजेंना का
विरोध करतो, तुला सोडणार नाही,’ असे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत दमदाटी केली.या घटनेची फिर्याद माजी आमदार चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव कदम (वय ७५) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात कलम २९४, ५०४, ५०६, ५०७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी कदम यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. फलटण ठाण्याचे पोलीस निरीक्षक फडतरे तपास करत आहेत.