मुले रमली चित्रपटाच्या दुनियेत...
By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:35:45+5:302015-01-19T00:21:24+5:30
वरकुटे मलवडी : जिल्हा परिषद शाळेत बालाजी वाघमोडे यांनी उलगडला प्रवास

मुले रमली चित्रपटाच्या दुनियेत...
वरकुटे मलवडी : चित्रपटाचे आकर्षण तसे सर्वांनाच असते; पण शाळकरी मुलांमध्ये त्याची अधिक करून उत्सुकता असते. चित्रपटातील कलाकर, दृश्य, निसर्ग आदींबद्दल त्यांच्यात कुतूहल निर्माण होते. अशाच या विद्यार्थ्यांना चित्रपट कसा तयार होतो, याची माहिती होण्यासाठी प्रा. बालाजी घोरपडे यांची प्रकट मुलाखत झाली. त्यांनी चित्रपटातील सर्व माहिती देऊन मुलांचे मनोरंजनही केले.‘आरं आरं आबा, आता तरी थांबा, मी अहिल्या होणार गं, संत कान्होपात्रा, डोंगरापल्याड, एका वाटेचा प्रश्न,’ आदी चित्रपटांचे लेखन करणारे आणि गीतकार प्रा. बालाजी वाघमोडे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम वरकुटे मलवडी, ता. माण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाला. यावेळी शिक्षक एम.डी. चंदनशिवे यांनी ही मुलाखत घेतली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंदनशिवे हे नेहमीच विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. सेमी इंग्लिश, संगणक प्रशिक्षण, ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब आदी उपक्रम शाळेत सुरू असतात. याचाच एक भाग म्हणून कला विषयाच्या तासिकेच्या वेळी प्रा. वाघमोडे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. वाघमोडे यांनी बालपण, शिक्षण, चित्रपट क्षेत्रातील प्रवेश, चित्रपटांची कथानके, अभिनय, गीते, शूटिंग आदी विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.
यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापिका मंगला सरक यांनी स्वागत केले. (वार्ताहर)
जोगवाची निर्मिती...
‘जोगवा’ चित्रपटाची निर्मिती कशी झाली यावरही प्रा. वाघमोडे यांनी सविस्तर माहिती दिली. समाजातील वास्तव जीवन चित्रपटात येत आहे, याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. विविध चित्रपटांतून राजा, खलनायक, शिक्षक आदी भूमिका कशाप्रकारे केल्या याचीही माहिती प्रा. वाघमोडे यांनी दिली.