मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा
By Admin | Updated: June 27, 2014 00:57 IST2014-06-27T00:54:49+5:302014-06-27T00:57:53+5:30
कऱ्हाड बाजार समितीच्या मैदानात ठिय्या : टोलविरोधी कृती समितीचा एकच नारा

मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा
मलकापूर : ‘शहराअंतर्गत टोल देशात कुठेही नाही. आंदोलने करून कोल्हापूरवासीयांची सहनशीलता संपली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात कोल्हापूर टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा; अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापुरात फिरकूही देणार नाही,’ असा इशारा टोलविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
कऱ्हाड येथील बाजार समितीच्या मैदानात टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कृती समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील तीन लाख चौरस फुटाचा भूखंड ‘आयआरबी’च्या ताब्यात आहे. त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावे व आयआरबीने केलेल्या कामाचेही मूल्यांकन करावे. ज्यांचे देणे लागेल, त्यांचे देणे मुख्यमंत्र्यांनी भागवावे. मात्र, हा शहरातील जनतेवरील अन्याय थांबवावा, अन्यथा कोल्हापूरची जनता पेटून उठेल.’
बाबा इंदूलकर म्हणाले, ‘कोल्हापूरची शाहू महाराजांची संस्कृती वेगळी आहे. आंदोलकांना कऱ्हाड शहराच्या एका बाजूला जागा देऊन प्रशासनाने दुजाभाव केला आहे. टोल रद्द हा निर्णय लवकर नाही घेतल्यास शासन व प्रशासनास मोठी किंमत मोजावी लागेल.’
यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, महापौर सुनीता राऊत, ‘जनसुराज्य’चे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे राजू लाटकर, विरोधी गटनेते मुरलीधर जाधव, अनिल राऊत, विनायक फाळके, रमेश पुरेकर, प्रकाश काटे, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, सुचिता साळोखे, सुजाता चव्हाण, आक्काताई जाधव, विजया फुले यांच्यासह सुमारे तीनशे आंदोलक अांदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)