आत्ताच पॉझिटिव्ह आलेय बघा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:01+5:302021-09-11T04:41:01+5:30
उत्सव काळात सातारकरांना कोविडचा विसर पडलाय, अशी अवस्था बाजारपेठेत फेरफटका मारताना जाणवते. गेल्या काही दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर सोशल ...

आत्ताच पॉझिटिव्ह आलेय बघा!
उत्सव काळात सातारकरांना कोविडचा विसर पडलाय, अशी अवस्था बाजारपेठेत फेरफटका मारताना जाणवते. गेल्या काही दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडलाय. गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी मोती चौक परिसरात चांगलीच गर्दी होती. हातगाडीवर साहित्य विक्रीस ठेवणाऱ्या विक्रेत्यांकडे महिलांचा गराडा होता. कोणीही सुरक्षित अंतर पाळत नव्हते म्हणून एका महिलेने तोंडावरचा मास्क काढत, ‘ए दादा, दे बाबा लवकर. हे बघ आत्ताच पॉझिटिव्ह आलेय. एकदाच खरेदी करून घरात ठेवते म्हणजे परत १५ दिवस बाहेर यायला नको.’ बाईंचे हे वाक्य ऐकल्यावर गर्दी पांगली आणि उरलेल्यांनी तोंडावर मास्क घेत सुरक्षित अंतर ठेवून खरेदीस सुरुवात केली. साहित्य खरेदी करून जात असतानाच, ‘दादा, गंमत केली रे, काही रिपोर्ट-बिपोर्ट नाय. पूर्वी लोक दानवाला, तर आता कोरोनाला घाबरतात. एवढं लक्षात आलंय म्हणून पॉझिटिव्हचं सांगितलं’, असं म्हणून महिला निघून गेल्यानंतर इतरांचा जीव भांड्यात पडला.
प्रगती जाधव-पाटील