कुटंबातील एकाची तरी तपासणी करा अन्यथा धान्य विसरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:05+5:302021-06-21T04:25:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी करण्यासाठी काही ग्रामस्थ तयार होत नसल्याने रेशन दुकानदार, आरोग्य ...

Check at least one of the family otherwise forget the grain! | कुटंबातील एकाची तरी तपासणी करा अन्यथा धान्य विसरा !

कुटंबातील एकाची तरी तपासणी करा अन्यथा धान्य विसरा !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी करण्यासाठी काही ग्रामस्थ तयार होत नसल्याने रेशन दुकानदार, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामपंचायत, कोरोना योध्दे यांच्या संकल्पनेतून रेशनकार्डधारकांच्या घरातील एका व्यक्तीची कोरोना रॅपिड चाचणी करावी अन्यथा रेशन मिळणार नाही, असा अलिखित नियम कोपर्डे हवेली येथे केला आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

या गावात चार दिवसात पाचशे ग्रामस्थांची चाचणी करण्यात आली असून, त्यात सहाजण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तपासणी करण्याची संख्या मर्यादित होती. त्यासाठी आरोग्य विभाग, गावातील रेशन दुकानदार, तलाठी, ग्रामपंचायत यांनी अलिखित नियम तयार करुन रेशनकार्ड ज्याचे आहे त्यांनी घरातील एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी केली पाहिजे अन्यथा धान्य मिळणार नाही. शासनाचा नियम नसताना रेशन दुकानदार दादासाहेब चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत तलाठी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत कोरोना योध्दे यांच्या सहकार्यातून ही मोहीम दोन दिवसांपासून राबविण्यास सुरूवात केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. एखाद्या घरात व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली जात आहे.

ही मोहीम राबवत असताना समाजमाध्यमांतून त्याचा प्रसार करण्यात आला. त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत असून, कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या मोहिमेमध्ये कोपर्डे हवेली उपकेंद्राचे डॉ. अमित जाधव, आरोग्यसेवक संदीप जाधव, आरोग्यसेविका धनश्री देशपांडे, अरुण साळुंखे, तलाठी संजय सावंत, रेशन दुकानदार दादासाहेब चव्हाण, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, कोरोना योध्दे आदींचा सहभाग आहे.

कोट...

ही मोहीम गावाच्या भल्याकरिता राबविण्यात येत आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भातावरून शिताची परीक्षा हाच या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत अनेकांचा सहभाग आहे. गावातील प्रत्येक घटक यामध्ये सामील झाला आहे.

- दादासाहेब चव्हाण,

रेशन दुकानदार, कोपर्डे हवेली.

चौकट...

गावातील घरटी एकाची कोरोनाची चाचणी करायची झाल्यास सुमारे तेराशे ते चौदाशे घरटी तपासणी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढणार आहे. यातून पुढील उपाययोजना करता येतील. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कोरोना रोखण्यास यश मिळते.

फोटो

२० कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली येथे प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीची कोरोना तपासणी केली जात आहे.

Web Title: Check at least one of the family otherwise forget the grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.