कमी व्याजदाराचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: January 20, 2015 00:02 IST2015-01-19T22:17:30+5:302015-01-20T00:02:08+5:30
दिल्लीच्या तिघांवर गुन्हा : व्यावसायिकाला गंडा

कमी व्याजदाराचे आमिष दाखवून फसवणूक
सातारा : येथील शनिवार पेठेत संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील एकास नवी दिल्ली येथील तिघांनी कमी व्याजदराच्या आमिषाने १.४० लाखाला गंडा घातला. याप्रकरणी राहुल शर्मा, प्रीती शर्मा, रिया (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सारंग चंद्रहार गायकवाड (रा. कुमठे फाटा, ता. कोरेगाव) यांचा साताऱ्यातील शनिवार पेठेत संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला आणि आम्ही व्यावसायिकांना पाच टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करतो. आपल्याला व्यवसायासाठी २५ लाख रुपये कर्ज दिले जाईल, असेही यावेळी गायकवाड यांना सांगण्यात आले. यानंतर थोड्याच दिवसांत गायकवाड यांना ‘स्टार बिझनेस सोल्युशन्स’च्या नावाने बँकेत सुरू असलेल्या खात्यावर काही रक्कम भरण्यास सांगितली. गायकवाड यांनी पहिल्यांदा १५ हजार, ३५ हजार, ५० हजार, ३० हजार असे एकूण १.४० लाख रुपये भरायला लावले. गायकवाड यांनी ही रक्कम भरली. मात्र, कर्जवितरण काही झाले नाही. त्यामुळे त्यांनी संंबंधितांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी राहुल शर्मा, प्रीती शर्मा, रिया (सर्व आरएलएफ सर्व्हिसेस, कीर्तीनगर, नवी दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला
आहे. (प्रतिनिधी)