पाठलाग करून चोरट्यास पकडले

By Admin | Updated: July 27, 2014 00:20 IST2014-07-27T00:11:52+5:302014-07-27T00:20:55+5:30

दहिवडी रस्त्यावर थरार : ग्रामस्थ जखमी

Chase caught and stole | पाठलाग करून चोरट्यास पकडले

पाठलाग करून चोरट्यास पकडले

दहिवडी : गोंदवले येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने घेऊन दुचाकीवरून पलायन करणाऱ्या चोरट्याच्या पाठलागात अनेक ग्रामस्थ जखमी झाले. मात्र, अशा अवस्थेतही ग्रामस्थांनी धाडस दाखवून थरारक पाठलाग करून चोरट्याला पकडले. ही खळबळजनक घटना आज, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे संदीप फडतरे यांचे ‘कोमल ज्वेलर्स’ या नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक युवक आला. दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून त्याने दागिने पाहण्याचे नाटक केले. अंगठी, चेन घेऊन त्याने पैसे देण्याचा बहाणा केला आणि दुकानातून धूम ठोकली. त्या चोरट्याने दुचाकीवरून दहिवडीकडे पलायन केले. याची माहिती मिळताच काही ग्रामस्थ व युवकांनी दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग सुरू केला.
दहिवडीपासून पुढे शेवरी-राणंदकडे जात असताना रस्त्यात चोरट्याने अनेक ग्रामस्थांना उडविले. यामध्ये काही पाठलाग करणारे ग्रामस्थही होते. जीव वाचविण्याच्या आकांताने चोरटा दुचाकी सुसाट चालवत होता. ग्रामस्थांना हुलकावणी देण्यासाठी चोरट्याने एका वळणावरून अचानक राणंदकडून दहिवडीकडे पुन्हा उलटा प्रवास सुरू केला. त्याच्या पाठोपाठ ग्रामस्थही होते. शेवरीतून मुळीकवाडीजवळील एका वळणावर ग्रामस्थांनी अखेर चोराला पकडले. तब्बल अर्धा तास हा पाठलाग सुरू होता. ग्रामस्थांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरटा सापडला. (प्रतिनिधी)

Web Title: Chase caught and stole