बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:26+5:302021-09-13T04:38:26+5:30

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन ...

Changing climate hits onion crop! | बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला फटका!

बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला फटका!

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डीसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कधी कडक ऊन, तर कधी पावसाची नुसतीच चिरचिर होत आहे. त्यामुळे कांदा पिकावर करपा तसेच होपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने औषधांच्या वाढत्या खर्चाने शेतकरी बेजार झाले आहेत.

वारंवार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने पळशी परिसरात अनेकांचे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. रोगामुळे कांद्याच्या पाती वाकड्या होऊन पिवळ्या पडल्या आहेत. कांद्याची वाढ थांबून पीक जळू लागले आहे. मुळकुज होत असल्याने कांदा पीक शेतातच नासून जाऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बरेच शेतकरी नुकसान टाळण्यासाठी अर्धवट वाढलेले कांदे काढून घेण्यासाठी लगबग करत आहेत. मात्र सध्या हजार ते बाराशेच्या दरम्यान दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही पदरात पडत नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति क्विंटल चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव होता; पण सप्टेंबरपर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच जणांचा कांदा शेतातच नासून गेला तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही, त्यामुळे शेतकऱ्याकडे कांदाच नव्हता अशी परिस्थिती होती. यावर्षीही शेतात तयार झालेला कांदा रोगाला बळी पडल्याने उत्पादन कमालीचे घटणार आहे. साठवलेला चाळीतील कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर काढला असला तरी दर नसल्याने मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापराला जातो; पण या हंगामात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. कांद्याला किमान तीन ते चार हजार दर मिळावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कोट..

सारखे वातावरण बदलत असल्याने कांद्यावर रोग पडत आहे. फवारणी करूनही औषधाची मात्रा लागू होत नसल्याने पीक हाती येईल का नाही, याची काळजी वाटते.

-दत्तू जळक, शेतकरी, पळशी

फोटो

पळशी (ता. माण) परिसरात बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर रोग पडून पिकाचे नुकसान झाले आहे. (छाया : शरद देवकुळे)

Web Title: Changing climate hits onion crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.