पत टिकविण्याचे आव्हान : खांदेवाले
By Admin | Updated: December 1, 2014 00:22 IST2014-11-30T21:17:57+5:302014-12-01T00:22:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडित नेहरूंनी दिलेल्या याबाबतच्या इशाऱ्याचा विसर पडला आहे.

पत टिकविण्याचे आव्हान : खांदेवाले
सातारा : ‘भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकन साम्राज्यवादाच्या विळख्यात अडकली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडित नेहरूंनी दिलेल्या याबाबतच्या इशाऱ्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जगामध्ये पत टिकवणे व संयमित पर्यायी संस्कृती निर्माण करण्याचे मोठे आव्हान देशापुढे आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बदलता भारत’ या विषय सूत्राच्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘भारताच्या आर्थिक धोरणाची दिशा व परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अण्णासाहेब होवाळे होते. प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. खांदेवाले यांनी अभिवादन केले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे उपस्थित होते.डॉ. खांदेवाले म्हणाले, ‘देशात भाजपचे शासन सत्तेवर आले असले तरी आर्थिक धोरण हे पूर्वीचेच सुरू राहिले आहे. लोकशाही समाजवादाला आपण तिलांजली दिली आहे. देशात झपाट्याने आर्थिक विकास होताना दिसत असला तरीही वरवरचा विशिष्ट लोकांचाच विकास होत आहे. गत वर्षात अती श्रीमंतांची मालमत्ता ३४ टक्क्यांनी वाढली आहे. अशाने नवा भारत निर्माण होणार नाही. चांगला समाज निर्माण करण्यासाठी सर्वांचेच आॅडिट करण्याची गरज आहे.’
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुदर्शन इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)