तरडगावात सुगड्या बनविणाऱ्या चाकाला मिळाली ‘विद्युतगती’

By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-04T23:10:06+5:302015-01-05T00:38:18+5:30

संक्रांतीची लगबग : कुंभारवाड्यात आधुनिक पद्धतीने काम

Chalkar gets 'electromagnet' | तरडगावात सुगड्या बनविणाऱ्या चाकाला मिळाली ‘विद्युतगती’

तरडगावात सुगड्या बनविणाऱ्या चाकाला मिळाली ‘विद्युतगती’

तरडगाव : हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी परंपरांगत पद्धतीने वाण वसा घेण्यासाठी मातीची सुगडी तयार करण्याच्या कामात तरडगाव, ता. फलटण येथील कारागीर मग्न झाले आहेत. बदलत्या काळानुसार चाक तेच असले तरी या चाकाला काहीनी इलेक्ट्रिक मोटार बसविली आहे. इलेक्ट्रिक मोटर बसविल्यामुळे या कामाला चांगलीच गती आल्याचे दिसून येत आहे. तरडगाव येथील कुंभारवाड्यात चाकावर मातीला आकार देऊन सणासाठी सुगड्या व पणत्या तयार करण्याचे काम सुरू आहे. यांत्रिक युगात संजय कुंभार या कारागीराने यंदा चाकाला हाताने गती देण्याऐवजी त्याला मोटार बसविल्याने काम गतीने होण्यास मदत होत आहे.
सध्या कुंभारवाड्यात श्रीरंग कुंभार, रवींद्र कुंभार, अशोक कुंभार, दत्तात्रय कुंभार हे कारागीर फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन सुगड्या तयार करीत आहेत. दरवर्षी हे कारागीर गाळाच्या मातीपासून सुगड्या बनवितात. या मातीत राख मिसळून त्याला टिकावूपणा आणला जात आहे. (वार्ताहर)

वस्तुविनिमय पद्धत आजही
दररोज भल्या पहाटे उठून प्रत्येक कारागीर साधारण ३०० ते ३५० सुगड्या बनवित आहेत. प्रत्येक वर्षी ५० ते ६० हजार सुगड्या येथील कुंभारवाड्यात बनविल्या जातात. त्या तरडगावसह चव्हाणवाडी, कापडगाव, आरडगाव, कुसूर, माळेवाडी, शिंदेमाळ, रावडी, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी नेऊन विकल्या जातात. वाड्या-वस्त्यांवर सुगड्यांच्या बदल्यात धान्य घेऊन वर्षांनुवर्षे बलुतेदार पद्धत वापरली जाते.

कारागिरांची कमतरता
काही कारागीर ही पद्धत अजून वापरत असले तरी अलीकडच्या काळात मात्र पाच सुगड्यांचा एक खण ४० ते ५० रुपयांना विकला जात असल्याने बलुते पद्धत संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच आधुनिकीकरणामुळे तालुक्याच्या कुंभारवाड्यातील तरुणांमध्ये मातीची भांडी तयार करण्यात उदासीनता दिसत असल्याने कारागीरांची संख्यादेखील कमी होत असल्याचे जाणवत आहे.


पूर्वी चाकावर तासाला ७० ते ८० सुगड्या तयार होत; परंतु यंदा चाकाला इलेक्ट्रिक मोटार बसविल्याने तासाला १२० ते १३० सुगड्या तयार होऊ लागल्याने कामाला चांगली गती आली आहे.
- संजय कुंभार,
कारागीर, तरडगाव

Web Title: Chalkar gets 'electromagnet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.