महाबळेश्वरच्या पॉइंटवर सिमेंटचे रस्ते
By Admin | Updated: August 24, 2014 22:40 IST2014-08-24T21:35:21+5:302014-08-24T22:40:17+5:30
४५ कोटींचा निधी : नगरोत्थान योजनेतून मिळाली मंजुरी

महाबळेश्वरच्या पॉइंटवर सिमेंटचे रस्ते
महाबळेश्वर : ‘येथील पॉइंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आता खड्डेमुक्त व चकाचक रस्ते पाहावयास मिळणार आहेत. कारण पालिकेने पॉइंटकडे जाणारे काही रस्ते हे सिमेंटचे तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सादर केलेल्या ४५ कोटींच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाने सौंर्दयाची मुक्त हस्ते उधळण केली आहे. ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी महाबळेश्वरला भेट देतात. महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असणाऱ्या येथील सर्व पॉइंटकडे जाणारे रस्ते हे धनदाट जंगलातून जातात. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मुसळाधार पावसामुळे येथील डांबरी रस्ते खराब होतात व रस्त्यात जागोजागी खड्डे पडतात, अशा खड्ड्यातून वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे पर्यटकांत नाराजीचे सूरही उमटत असतात.
पर्यटकांची या त्रासातून मुक्तता व्हावी, यासाठी पालिकेने पॉइंटकडे जाणारे सर्व रस्ते सिमेंटचे करून सिमेंटचे गटार व रस्त्यावर आकर्षक विद्युत पोल बसविण्याचा निर्णय घेतला होता.
यानुसार कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या आंदाजपत्रकास शासनाची मंजुरी घेण्यात आली व निधी मिळावा, यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला होतो.
दि. २२ रोजी नगरसविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रस्तावास नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार एकूण ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’ अशी माहिती पालिकेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी
दिली. (प्रतिनिधी)