सिमेंट बंधारे चौकशी समितीला ‘दिरंगाईची गळती’

By Admin | Updated: July 30, 2014 23:18 IST2014-07-30T23:08:27+5:302014-07-30T23:18:28+5:30

भ्रष्टाचाराचा पाणलोट : गौडबंगाल कायम; अधिकारी म्हणतात हा विषय राज्य शासनाचा..!

Cement Bonding Inquiry Committee 'Leakage Leakage' | सिमेंट बंधारे चौकशी समितीला ‘दिरंगाईची गळती’

सिमेंट बंधारे चौकशी समितीला ‘दिरंगाईची गळती’

सातारा : दुष्काळी तालुक्यात झालेल्या साखळी सिमेंट बंधाऱ्यातील गुणनिंयत्रण चाचणी चौकशी अहवालाला ‘दिरंगाईची गळती’ लागली आहे. हा चौकशी अहवाल कधी येणार, याविषयी कृषी विभागातील अधिकारी ठामपणे बोलायला तयार नाहीत. जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांनी हा विषय आता आमच्या अखत्यारित राहिला नसल्याचे सांगत त्यांनी राज्य शासनाकडे बोट केले आहे. परिणामी या चौकशी अहवालाचे गौडबंगाल आहे तरी काय, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाणलोट विकास एक हजार कोटीहून अधिक रुपयांचा आहे. यापैकी माण आणि खटाव तालुक्यातच सर्वाधिक कामे झाली आहेत. उर्वरित तालुक्यात कामे जरी झाली असलीतरी तेथील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अजूनही तितक्याशा चर्चेत आलेल्या नाहीत. माण आणि खटाव तालुक्यातील साखळी सिमेंट बंधारे मात्र चांगलेच चर्चेत आले आहेत. या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामेही निकृष्ट झाल्याची तक्रार होती. या कामांचे गुणनियंत्रण करावे, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीने उपोषण केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. याचवेळी ही समिती दहा दिवसांत आपला अहवाल देणार असेही कृषी अधीक्षक कार्यालयाने सांगितले होते.
मात्र, महिना झाला तरी साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील भ्रष्टाचार आणि गुणनियंत्रण चाचणी चौकशीचा अहवाल पूर्ण झालेला नाही. हा अहवाल कधी येणार आणि पूर्ण होणार याची माहिती कृषी अधीक्षक कार्यालयालाही नाही. कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. हा विषय आता राज्याचा बनल्याचे त्यांनी सांगितले आणि साखळी सिमेंट बंधारे त्याचबरोबर पाणलोटची कामे उत्कृष्ट झाल्याचाही दावा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Cement Bonding Inquiry Committee 'Leakage Leakage'