उलटलेल्या रासायनिक टँकरमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 14:07 IST2017-09-20T13:57:20+5:302017-09-20T14:07:01+5:30
पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.

खंडाळा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटला आहे.
खंडाळा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
आम्लाची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने घाटातील टँकर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे तब्बल अठरा तासानंतरही घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
खंबाटकी घाट उतरताना मंगळवार दि .१९ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा (क्र टीएन -३० बी एच -६९७९) टँकर उलटला होता. टॅकर उलटल्याने त्यामध्ये असलेले नायट्रीक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास सुटला.
टँकरचा स्फोट होण्याच्या भितीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली होती. उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्रव्यामुळे टँकर जवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई नगरपालिका व भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले आहे.
आग्निशामक दलाच्या दोन्ही गाडी आल्यानंतरही आम्लाची दाहकता कमी करण्यास ही यंत्रणा तुटपूंजी ठरली . हे आम्ल हवेत मिसळल्याने परिसरात त्याचा वास जास्त प्रमाणात पसरल्याने या भागात जाणे कठीण बनले आहे . या परिसरातील गावांमधील लोकांनाही काही प्रमाणात याचा त्रास जाणवू लागला आहे .
टँकर उलटल्याने कोल्हापूरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली आहे . तब्बल अठरा तासानंतरही घाट मार्ग खुला होऊ शकला नसल्याने बोगद्यातून दुहेरी वाहतूक संथ गतीने सुरुच आहे.
दरम्यान, महामार्गावर आम्ल किंवा आम्लारी वाहतूक करणाºया टँकरबाबत अशा घटना घडल्यानंतर त्याची दाहकता कमी करण्याची यंत्रणा संपूर्ण सातारा जिल्हयातच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा वेळी नैसर्गिकरित्या अशा पदार्थांची दाहकता कमी होण्याची वाट पहावी लागते. मात्र, याचा त्रास परिसरातील नागरिकांना व इतर वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.