खाऊ घालणाऱ्या गल्लीत, पिणाऱ्यांची गर्दी
By Admin | Updated: December 16, 2014 23:39 IST2014-12-16T22:23:09+5:302014-12-16T23:39:17+5:30
तांदुळ आळीची व्यथा : तळीरामांच्या नित्य वावरामुळे महिलांना चालणेही मुश्किल

खाऊ घालणाऱ्या गल्लीत, पिणाऱ्यांची गर्दी
सातारा : ज्या तांदुळ आळीतून पूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील धान्य घेवून जात होते आता त्याच तांदुळ आळीत बाया बापड्यांचे मान वर करून चालणे मुश्किल बनले आहे. सकाळी सात वाजल्यापासून तळीरामांची मंदियाळी असलेल्या या गल्लीकडे आता कोणीतरी करडा कटाक्ष टाकण्याची गरज महिला बोलून दाखवत आहेत.
पूर्वीच्या शहराचे हृदय असणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या लोकांचे वास्तव्याचे आणि वावरण्याचे ठिकाण म्हणून तांदुळ आळी परिचित होते. किराणा मालाचा व्यापार आणि दर्जेदार तांदुळ मिळण्याचे ठिकाण म्हणून तांदुळ आळी हे नाव पडले. ज्या लंबेंकडे पूर्वी कर्मवीर येत होते, त्याच लंबेंच्या बोळात आता तट्टी मद्यपींची पावले लडखडू लागली आहेत.
मोती चौक ते बागलांच्या दुकानापर्यंत २ वाईन शॉप, ३ व्हिडिओ गेम पार्लर आणि ३ बार आहेत. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असतो, असे म्हटल्यास अतिश्योक्ती वाटू नये. अनेकदा पोलिसही गुन्हा घडला की गुन्हेगाराला शोधण्यासाठी या परिसरात येत असल्याचे दिसते.
एकीकडे आदिशक्ती देवीचे मंदिर आणि दुसरीकडे मद्यपींची डांगडींग यामुळे या परिसरातून जा-ये करणंही नागरिकांना अशक्य होवू लागले आहे. यावर तातडीने उपाय काढण्याची मागणी व्यापारी करत
आहेत. (प्रतिनिधी)
साताऱ्यातील उच्चाब्रु लोकांची वस्ती आता मद्यपींच्या उद्योगांमुळे बदनाम होवू लागली आहे. याकडे पोलिस प्रशासनानेही दुर्लक्ष केल्यामुळे दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. देशी दारू दुकान चालकांनी रस्त्यावर पडलेल्या मद्यपींना किमान गल्लीतून हाकलावं. यामुळे महिलांना सुरक्षित वाटेल.
- बबनराव सापते, जिल्हाध्यक्ष, वारकरी सांप्रदाय
‘आर्धी’ ला आहे का?
देशी दारूच्या दुकानात दारू घेण्यासाठी येणाऱ्यांना पूर्ण बाटली विकत घ्यावी लागते. हातावरचे पोट असणाऱ्या अनेकांना पूर्ण बाटली घेणं परवडत नाही. अशावेळी दुकानाच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांना ‘आर्धी’ला आहे का, अशी विचारणा होते. आर्धीला म्हणजे अर्धी बाटली घेणार का!
काही दिवसांपूर्वी तांदुळ आळीत किरकोळ कारणावरून एक खुनही पडला होता. मद्यपींच्या धिंगाण्याची कशी तरी सवय करून घेत येथे राहणाऱ्या अनेकांना या घटनेमुळे धस्स झाले. आताही रात्री एकट्या महिलेला बाहेर सोडण्यास लोक तयार नाहीत