गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले
By Admin | Updated: January 2, 2017 23:13 IST2017-01-02T23:13:36+5:302017-01-02T23:13:36+5:30
चिमणपुरातील दुचाकी जळीत घटना : कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातांनी साधला डाव

गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले
सातारा : गाड्या जाळण्याचे प्रकार पूर्वी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये घडत होते. हे प्रकार आता सातारा शहरातही घडू लागल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ‘गाड्या सांभाळा, रात्रीस खेळ चाले,’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देत गोसावी कुटुंब रविवारी मध्यरात्री साखरझोपेत असतानाच फटाके वाजल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेर येऊन पाहताच दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करून इतरांना जागे करून होणारा अनर्थ टाळला.
सातारा शहरातील चिमणपुरा पेठेत अज्ञातांनी घरासमोर लावलेल्या चार दुचाकी जाळल्या. या घटनेने पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गोसावी कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली.
येथील चिमणपुरा पेठेत गोसावी यांचे तीन कुटुंब आणि भाडेकरूंचे तीन अशी सहा कुटुंबे राहतात. महेंद्र गोसावी यांनी आपली दुचाकी व इतर दोन दुचाकी घराबाहेर लावल्या होत्या तर एक दुचाकी घराच्या जिन्याखाली लावली होती. अज्ञातांनी अगोदर महेंद्र यांच्या दोन्ही दुचाकींना आग लावल्याने त्यांच्याच गाडीच्या शेजारी असणाऱ्या दोन गाड्यांना झळ बसल्याने त्याही जळाल्या. जाळलेल्या चार दुचाकीपैकी केवळ एका गाडीचा विमा असून, तीन गाड्यांचा विमा उतरविले नसल्याचे महेंद्र गोसावी यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी रात्री एकच्या सुमारास घराजवळ कुत्रे जास्त भुंकत असल्याने बाहेर येऊन पाहणी केली असता, कोणतीही हालचाल निदर्शनास न आल्याने पुन्हा झोपी गेले. हीच संधी साधून अज्ञातांनी आपला डाव साधला. यापूर्वी त्यांनी कुत्रे जास्तच भुंकत असल्याने कुत्र्यांचाही बंदोबस्त केला. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले. नंतर कुत्रे झोपी गेल्याने दीडच्या सुमारास चारही दुचाकी जाळल्या गेल्या. (प्रतिनिधी)
घटनेला राजकीय किनार?
चिमणपुरामधील घडलेल्या घटनेला अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ही घटना दोन राजकीय कलहातून घडली असल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. त्या घटनेशी काहीजण संबंध जोडत आहेत. गोसावी कुटुंबीयांची कोणाची, कोणाशी शत्रुत्वही नाही, तर अशा घटना वारंवार घडत असल्याने चिमणपुरा पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून ही घटना घडली तर नसेल ना, अशी चर्चा सध्या पेठेत पाहायला मिळत आहे.