बसर्गेतील बलात्कारप्रकरणी महागावच्या युवकास अटक
By Admin | Updated: August 24, 2014 00:38 IST2014-08-24T00:38:09+5:302014-08-24T00:38:09+5:30
‘लोकमत’चा दणका : तरुणाईच्या आंदोलनास यश

बसर्गेतील बलात्कारप्रकरणी महागावच्या युवकास अटक
गडहिंग्लज : दीड महिन्यापूर्वी बसर्गे येथील महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी संशयित आरोपी भारत शंकर पाटील (वय २६, रा महागाव-धनगरवाडा, ता. गडहिंग्लज) यास पोलिसांनी आज, शनिवारी अटक केली. या प्रकरणास वाचा फोडून ‘लोकमत’ने पोलीस प्रशासनास दिलेला दणका आणि सर्वपक्षीय पक्षसंघटनांनी केलेली नराधमाच्या अटकेची मागणी व दडपणाच्या प्रयत्नांनंतर पाच हजारांवर तरुणांनी काढलेल्या विराट मोर्चाची गंभीर दखल घेऊन अखेर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकाव्या लागल्या.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : १२ जुलै २०१४ रोजी सकाळी नऊ वाजता बसर्गे-नौकुड मार्गावरील येणेचवंडी फाट्यावर कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला निळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या युवकाने जबरदस्तीने मोटारीत घालून त्याच परिसरातील नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या झुडपात नेऊन बलात्कार केला.
अत्याचारानंतर तासाभराने शुद्धीवर आलेल्या त्या युवतीने घरी जाऊन घरच्या मंडळींना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिने स्वत: हलकर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद नोंदविल्यानंतर अज्ञात संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संशयिताचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची माहिती दिली. संशयिताचे रेखाचित्र तयार केले.
घटनास्थळी तिची ओढणी, दप्तर, छत्री व ओळखपत्र, आदी साहित्य सापडले; परंतु तिचा मोबाईल गायब होता. पोलीस तपासात तिचा मोबाईल संशयित आरोपीकडे सापडला. घटनेच्या आदल्या दिवशीही तो त्या बसथांब्यावर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेखाचित्राशी मिळताजुळता चेहरा व त्याच्याकडे तिचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दरम्यान, पीडित तरुणीचे अपहरण, बलात्कार, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध चार कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
३० मोटारी, ९७ संशयितांची झडती
पीडित युवतीने दिलेल्या माहितीवरून एमएच ०४ - ७० या नंबरमुळे ठाणे पासिंगच्या निळ्या रंगाच्या २५ ते ३० मोटारी आणि रेखाचित्रावरून तब्बल ९७ संशयितांची झडती पोलिसांनी घेतली. मात्र, गुन्ह्यातील मोटारीचे गूढ कायम आहे. खऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी अजूनही राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.
महिला आयोग मागणीवर ठाम
पीडित तरुणीची भेट घडवून देण्याची लेखी मागणी राज्य महिला लोक आयोगाने केली आहे. मात्र, पोलिसांनी ही भेट घडवून न आणल्यामुळे ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे व कॉ. उज्ज्वला दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात आज, शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.