बस थेट पोलीस मुख्यालयातसाहित्यावरून वादावादी : फाळकूटदादाची वाहकाला दमदाटी
By Admin | Updated: January 6, 2015 00:49 IST2015-01-05T23:33:51+5:302015-01-06T00:49:28+5:30
दरम्यान, तौसिफची दमदाटी वाढत चालल्यामुळे संतापलेले वाहक लोखंडे यांनी चालकाला ही बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली. मात्र, प्रवाशांनी ‘हा वाद मिटवून घ्या,

बस थेट पोलीस मुख्यालयातसाहित्यावरून वादावादी : फाळकूटदादाची वाहकाला दमदाटी
सातारा : बसमध्ये साहित्य ठेवण्याच्या कारणावरून एका फाळकूटदादाने वाहकाला दमदाटी करून शिवीगाळ करण्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता सातारा शहर बसस्थानकात घडली. दरम्यान, यावेळी संबंधित फाळकूटदादाने शहरातील त्याच्या अन्य काही मित्रांना बोलावून येथे अरेरावी केल्यामुळे त्याचा फटका पन्नासहून अधिक प्रवाशांना बसला. परिणामी चालक आणि वाहकाने बस थेट पोलीस मुख्यालयातच आणून लावली. दरम्यान, याप्रकरणी वाठार स्टेशन येथील एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली आणि वाहक तुषार लोखंडे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा आगारातून फलटण आगाराची शेवटची बस रात्री साडेनऊ वाजता सुटते. रविवारी नेहमीप्रमाणे रात्री सातारा आगारातून फलटण आगाराची बस (एमएच १४ बीटी २६०१) फलटणला जाण्यासाठी निघाली. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होते. काही प्रवासी उभे होते. वाहक म्हणून तुषार कुमार लोखंडे (वय २६, रा. सगुणामाता नगर, फलटण) तर चालक म्हणून तांबे ड्यूटीवर होते.
बसमध्ये तिकिटे काढत असतानाच तौसिफ नासिर शेख (रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) या प्रवाशाने आपले साहित्य शेवटच्या बाकावर ठेवले होते. हे साहित्य कोणाचे आहे, अशी विचारणा लोखंडे यांनी करताच ते शेखने आपले असल्याचे सांगितले. यावर लोखंडे यांनी ही जागा प्रवाशांना बसण्यासाठीची असून, साहित्य ठेवण्यासाठीची नाही, असे सांगितले. वाहक लोखंडे यांनी हे साहित्य आपण खाली अथवा वरती रॅकवर ठेवावे, अशी विनंतीही केली. मात्र, तौसिफने वाहकाचे न ऐकता त्यालाच दमदाटी करण्याबरोबरच शिवीगाळही केली. यामुळे बसमध्ये गोंधळ झाला. आम्ही साहित्याचेही तिकीट काढतो; पण साहित्य खाली ठेवणार नाही, अशी दमदाटीही शेखने केली. शेखसमवेत अन्य तिघेजणही होते. त्यांनीही वाहकाला दमदाटी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तौसिफची दमदाटी वाढत चालल्यामुळे संतापलेले वाहक लोखंडे यांनी चालकाला ही बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली. मात्र, प्रवाशांनी ‘हा वाद मिटवून घ्या, आम्हाला लवकर घरी जायचे आहे,’ असे नमूद केले. मात्र, तौसिफची दादागिरी वाढतच चालली होती. लोखंडे यांना ‘तुला बघून घेतो, तू वाठारला चल,’ अशी दमदाटीही केली.
अखेर वाहकाने एसटी बस मुख्यालयाच आणली. यानंतर पोलीस ठाण्यात तौसिफ नासिर शेख विरोधात लोखंडे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी शेखवर प्रतिबंधात्मक कारवाई
केली. (प्रतिनिधी)
कारवाईला घाबरून टग्यांनी काढला पळ
सातारा बसस्थानकात गेल्या काही दिवसांत फाळकूटदादांची अरेरावी वाढत चालली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच-सहा फाळकूटदादांनी पोलीस चौकीतील एका हवालदाराला दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी फाळकूटदादांना चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर रविवारी रात्रीही काही फाळकूटदादांनी असाच प्रकार केला. वाहक तुषार लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेख आणि त्याच्या मित्रांने साताऱ्यातील काही मुलांना बोलावून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी बस पोलीस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या फाळकूटदादांनी येथून पळ काढला.