पत्रावळीला जळमटं; प्लास्टिकला चकाकी
By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:25:44+5:302014-12-09T23:23:28+5:30
व्यावसायिक अडचणीत : कच्च्या मालाचे दर वाढल्याचा परिणाम, पानांची पत्रावळी हद्दपार

पत्रावळीला जळमटं; प्लास्टिकला चकाकी
शंकर पोळ- कोपर्डे हवेली -कच्च्या मालाचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे सध्या बहुतांश व्यवसाय गोत्यात आल्याचे दिसते. इतर व्यवसायांप्रमाणे पत्रावळी व्यवसायालाही महागाईचा चांगलाच फटका बसलाय. कच्च्या मालाचे दर वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी हा व्यवसायच गुंडाळल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी झाडांच्या पानांपासून पत्रावळी तयार केली जायची. पिंपळ व सागाची पाने वापरून तयार करण्यात येणाऱ्या या पत्रावळीला ग्रामीण भागात चांगली मागणी होती. साधारणपणे गावोगावचे पुजारी अशा पत्रावळ्या बनविण्याचे काम करायचे. त्यानंतर शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाऊ लागले. अनेकजण घरगुती व्यवसायात पत्रावळी बनविण्याचा व्यवसाय करू लागले. काळ बदलला तशी पत्रावळीही बदलली. झाडाच्या पानांची जागा कागदाने घेतली. मशिनच्या साह्याने कागदाच्या पत्रावळ्या तयार होऊ लागल्या. त्यामुळे पानाऐवजी कागदापासून बनविलेल्या पत्रावळ्या ‘स्टॅन्डर्ड’ म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. परिणामी, कागदापासून पत्रावळ्या बनविण्याचा हा व्यवसाय भरभराटीस आला. कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या जेवणावळीसाठी लोक स्टीलच्या ताटाऐवजी पत्रावळीला पसंती देऊ लागले. कालांतराने हे प्रमाण वाढतच गेल्याने या व्यवसायातही स्पर्धा निर्माण झाली. चांगला फायदा होत असल्याने अनेकजण या व्यवसायात उतरले.
व्यावसायिकांची संख्या वाढल्यानंतर मात्र तयार झालेल्या पत्रावळ्या व द्रोण खपविण्याचे आव्हान निर्माण झाले. अनेक व्यावसायिकांकडे तयार पत्रावळ्या व द्रोणांचे ढिग तयार झाले. अखेर या व्यावसायिकांनी तयार पत्रावळ्या विक्रीसाठी ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांना दिले. व्यापाऱ्यांनीही कमी किमतीत अशा पत्रावळ्या स्वीकारून त्याची जास्त किमतीत विक्री सुरू केली. हळूहळू व्यावसायिक तोट्यात व विके्रते फायद्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. अशातच वाढत्या स्पर्धेचा परिणाम म्हणून कागदाच्या पत्रावळीला प्लास्टिकची झळाळी मिळाली. अनेक व्यावसायिकांनी कागदाऐवजी पॉलिस्टर पेपर वापरून आकर्षक, रंगीबेरंगी पत्रावळ्या तयार करण्यास सुरूवात केली. चार वर्षांपूर्वी द्रोण, पत्रावळी विक्रीच्या मूळ दरात घसरण झाली. त्यानंतर आजपर्यंत व्यापाऱ्यांकडून पत्रावळीचा खरेदी दर कमीच केला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक तोट्यात गेल्याचे चित्र दिसून येते. गेल्या वर्षभरात पिशवी, पॅकिंग, पॉलिस्टर पेपर आदी कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. तसेच व्यावसायिक कात्रीत सापडलेत. तसेच वीजदर व मजुरी व वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. परिणामी, हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे.
मुंबई, पुण्यातून द्रोणची खरेदी
कच्च्या मालाचे दर वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांनी द्रोण करण्याचे थांबविले आहे. मुंबई, पुणे येथून द्रोण आणून त्याची विक्री करण्यात येत आहे. ३३० रूपयांना १ हजार ५०० द्रोण मिळत आहेत. व्यापारी ग्राहक बघून दर ठरवतात. त्या पद्धतीने विक्री होत असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे.
बचत गटही अडचणीत
पत्रावळी व्यवसाय चांगला चालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक बचत गटांनी या व्यवसायात पदार्पण केले. मध्यंतरीच्या कालावधीत अनेक बचत गटाच्या महिला या व्यवसायात उतरल्या. मात्र, सध्या कच्च्या मालाच्या किमती आणि मार्केटिंग व्यवस्थित होत नसल्याने व्यवसाय तोट्यात सुरू आहे.
यात्रांच्या जेवणावळीतही पत्रावळी
गावोगावच्या यात्रांचा हंगाम सुरू झाल्यानंतर जेवणावळीही सुरू होतात. पूर्वी पै-पाहुण्यांना जेवण्यासाठी ताट, वाटी दिली जायची. मात्र, सध्या ही परिस्थिती बदलली आहे. पाहुण्यांसाठी द्रोण, पत्रावळी दिली जातेय. ताट, वाटी धुण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट त्यातून वाचविला जातोय.
खर्च वाढला, उत्पादन घटले
दोन वर्षांपूर्वी कच्च्या कागदाचा एक किलोचा दर ३२ रूपये होता. सध्या हाच दर प्रतिकिलो ३७ ते ३८ रूपये आहे. वीजदरामध्येही ३० टक्के वाढ झाली आहे. मजुरीचा पूर्वीचा दर २०० रूपये होता. तो सध्या ३०० रूपये झाला आहे. पत्रावळी विक्रीचा दोन वर्षांपूर्वीचा दर ९० रूपये शेकडा होता. सध्या ५२ रूपये शेकडा दराने व्यावसायिकांकडून विक्रेते पत्रावळी खरेदी करीत आहेत.
ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. काहीवेळेला विक्रेत्यांवर अवलंबून रहावे लागते. मात्र, विक्रेते आमच्याकडून कमी दराने पत्रावळी व द्रोणची खरेदी करतात. मी स्वत: सध्या विक्रेत्यांना पत्रावळ्या देणे बंद केले आहे. गावोगावी फिरूनच मी पत्रावळ्या विकतो.
- अमोल पवार,
व्यावसायिक, कोपर्डे हवेली