बैलगाड्या शर्यतींची तलफ प्रदर्शनावर
By Admin | Updated: December 17, 2015 23:02 IST2015-12-17T22:40:24+5:302015-12-17T23:02:27+5:30
गावोगावच्या यात्रा : खिलार जनावरांना पाहण्यासाठी गर्दी

बैलगाड्या शर्यतींची तलफ प्रदर्शनावर
सातारा : माण तालुक्यताील म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेने जिल्ह्यातील प्रमुख यात्रांना सुरुवात झाली आहे. यात्रेमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती लावण्याला प्राधान्य दिले जात होते. करमणुकीचे एकमेव साधन असल्याने लोक याची वाट पाहत असायचे दरम्यान न्यायालयाने शर्यतीवर बंदी घातल्याने ही बैले आता प्रदर्शनात आणली जाऊ लागली आहे.
या वर्षाच्या प्रदर्शनीय मोठ्या गावच्या यात्रांना लवकरच प्रारंभ होत असून, या यात्रांमध्ये होणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनासाठी हौशी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात आज शेतीमध्ये बैलांचे महत्त्व कमी झाले असले तरी बैलांच्या किमती मात्र, आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
खिलार जातीच्या जनावरांना बाजारामध्ये चांगलेच महत्त्व आले असून, साधारणपणे लाखाच्या घरामध्येही या जातीच्या बैलाला किंमत येत आहे. जिल्ह्यामध्ये विशेषत: पुसेगाव, औंध तसेच नागेवाडी, कोरेगाव, कऱ्हाड, सातारा, नागठाणे येथे जनावरांचे आठवडा बाजार भरत असले तरी यात्रेमध्ये भरणाऱ्या जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनामध्ये हजारो जनावरांची दररोज उलाढाल होत असते. पंढरपूर, खरसुंडीसारख्या जनावरांच्या बाजारात खिलार जातीचे बैल लाख रुपये किमतीला विकले गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बैलांच्या किमती आणखी वाढत आहेत. आज यांत्रिकीकरणाचे युग आहे तरीही बैलांच्या किमती वाढत्या असल्याने दोन-दोन बैले पाळणारा शेतकरी आता एकच बैल पाळताना दिसत असून, शेतकरी पैऱ्याची शेती कसताना दिसताहेत. आजही आठवडा बाजारामध्ये खिलार जातींच्या बैलांना चांगली मागणी आहे. आता पुसेगावच्या सेवागिरी देवस्थानची यात्रा जवळ आली असून, तेथील बाजाराला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्याठिकाणी स्पर्धाही असतात. त्या यात्रेला जाण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. संकरित गायींच्या तुलनेत खिलार जातीमधील गायी सध्या कालबाह्य होत असल्याने या गावी विकत घेण्यासाठी जातीवंत शेतकरी सातत्याने प्रयत्नशील असतात.
ही जातच अस्सल असल्याने या प्रकरातील जनावरे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. अलिकडील काही वर्षे संकरित जनावरांच्या पैदाशीसाठी भर दिला जात असला तरी पूर्वीच्या अस्सल प्रकारातील जनावरांच्या पैदासीसाठीही प्रयत्न व्हायला हवेत. (प्रतिनिधी)
बक्षिसांची लयलूट
पुसेगाव, औंध, नागेवाडी, नागठाणे येथील यांत्रावेळी यात्रांवेळी यात्रेतील प्रमुख कार्यक्रम संपल्यावर जनावरांच्या जंगी प्रदर्शनाचे आयोजन यात्रा कमिटी तसेच स्थानिक बाजार समितीच्या सहकार्याने करण्यात येत असते. जनावरांच्या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातून तसेच जिल्ह्या बाहेरूनही अनेक ठिकाणाहून जातीवंत जनावरे दाखल होत असतात. काही ठिकाणच्या यात्रेमध्ये बैलांच्या व अन्य जनावरांच्या विविध जातींमधून जातीवंत खोंडाची बैलांची, गायीची निवड करून त्यांना विविध प्रकारची बक्षिसे दिली जातात.